सोनू भिडे, झी मीडिया, नाशिक : नाशिक पुणे नंतर नाशिक बोरीवली या मार्गावर राज्य परिवहन महामंडळाने वातानुकुलीत e-bus सुरु केली. नागरिकांचा मिळणारा प्रतिसाद बघता नाशिकच्या परिवहन मंडळाने (Transport Board of Nashik) 1 एप्रिलपासून सप्तशृंगी गडापर्यंत वातानुकुलीत e-bus सेवा सुरु केली आहे. यामुळे सप्तशृंगी देवीच्या (Saptshringi Devi) दर्शनाला जाणाऱ्या भाविकांचा प्रवास सुखकर होणार आहे.
असा असेल प्रवास
नाशिकच्या जुन्या बस स्थानकापासून सप्तशृंगी वणी गड इथं जाण्यासाठी महामंडळाच्या बस जात असतात. मात्र आज पासून या मार्गावर वातानुकुलीत e-bus धावणार आहेत. या बस स्थानकावरून प्रायोगिक तत्वावर दोन बस एक एप्रिलपासून धावणार आहेत. दिवसभरात वातानुकुलित बसचा (AC Bus) 12 फेऱ्या असणार आहेत. सकाळी पाच वाजता पहिली बस जुने बस स्थानक इथून सुटणार आहे. पुढील दोन तासात हि बस वणी गड इथं पोहचेल. अर्ध्या तासाच्या विश्रांती नंतर हीच बस वणी गड येथून परतीचा प्रवास करणार आहे.
असे आहे वेळापत्रक
जुन्या बस स्थानकावरून वणी गड इथं जाण्यासाठी प्रत्येक तासाला लालपरी आहे. तर वातानुकुलीत पहिली e-bus बस सकाळी पाच वाजता जुन्या बस स्थानकावरून सुटले. तर दुसरी बस 5.30 वाजता सुटेल. दोनही बस दोन तासानंतर वणी गड येथे पोहचल्यानंतर अर्ध्या तासानंतर म्हणजेच 7.30 आणि 8 वाजता वणी गड (Nashik Vani) इथून परतीला प्रवासाला निघतील. नाशिक इथं आल्यानंतर बॅटरी चार्ज करुन या दोनही बस पुन्हा 11.30 आणि 12 वाजता वणी गडाकडे प्रस्थान करतील. संध्याकाळी 6 आणि 6.30 वाजता पुन्हा या बस वणी गडाकडे प्रस्थान करतील.
इतके असेल भाडे
या बस मध्ये एकूण 34 आसन व्यवस्था आहे. लाल परीचे साधारण भाडं 120 रुपये आहे. तर e-bus चे भाडे 170 रुपये असणार आहे. या बस प्रवासामध्ये 5 ते 10 वर्ष्याच्या मुलांना आणि महिलांना तिकिटामध्ये ५०% सवलत असणार आहे. तर 75 वर्षावरील प्रवाशांना मोफत प्रवास असणार आहे.
धार्मिक स्थळांवर सुरु होणार e-bus
नाशिक जिल्ह्यातील धार्मिक स्थळांवर e-bus सुरु करण्याचा मानस राज्य परिवहन मंडळाचा आहे. मात्र सप्तश्रिंगी गडावरील भाविकांचा प्रतिसाद बघून त्र्यंबकेश्वर आणि शिर्डी या मार्गावरही पर्यावरणपूरक e-bus सुरु करणार असल्याच म्हटलं जात आहे.