सावधान! उन्हाळ्यातील कुलर ठरतोय किलर, आजोबा आणि नातवासाठी ठरली मृत्यूची हवा?

कुलरच किलर ठरल्याची धक्कादायक घटना नाशिक जिल्ह्यात उघडकीस आली आहे

Updated: Apr 28, 2022, 05:18 PM IST
सावधान! उन्हाळ्यातील कुलर ठरतोय किलर, आजोबा आणि नातवासाठी ठरली मृत्यूची हवा? title=

योगेशे खरे, झी मीडिया, नाशिक : राज्यात सध्या उष्णतेचा कहर सुरु आहे. तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे गेलं आहे. अशात प्रत्येकाच्या घरात एसी किंवा कुलरचा वापर सर्रास केला जातो. ग्रामीण भागात घराघरात मोठ्या प्रमाणावर कुलरचा वापर केला जातो. पण हा कुलरच किलर ठरल्याची धक्कादायक घटना नाशिक जिल्ह्यात उघडकीस आली आहे.

नाशिक जिल्ह्यातील महडमध्ये बागलाण तालुक्यात सोनावणे कुटुंब रहातं. घरात गारवा मिळावा यासाठी सोनावणे यांनी आपल्या घरात कुलर बसवला. पण हाच कुलर सोनावणे कुटुंबासाठी यमदूत ठरला. शेतीसाठी घरात ठेवलेलं किटकनाशक औषधाचं द्रव्य कुरलच्या हवेतून खोलीत पसरलं. त्यामुळे सोनावणे कुटुंबातील चार जणांची प्रकृती बिघडली. 

सर्वात आधी घरातला 14 वर्षांच्या मुलाची प्रकृती बिघडली, त्यानंतर एक दोन दिवसातच 68 वर्षांच्या आजोबांचीही प्रकृती खालावली. या दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण उपचारादरम्यान आजोबा आणि नातवाचा मृत्यू झाला. तर मुलाची आई आणि मुलीला नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.

आजोबा आणि नातवाच्या मृत्युचं कारण शोधण्यासाठी नमूने पुणे इथल्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. जिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या शरीरात मॅगनिज आणि टिन अधिक प्रकारात मिळून आले असल्याचं स्पष्ट केलं आहे.

या कुटुंबाला खरंच कुलरमधून मृत्यूची हवा मिळाली का ? टिन मॅग्निज कुठून आले ? हवेतून प्रदूषण झाले तर मग घरातील वडील आणि मोठी मुलगी आजी सुखरुप कसे अनेक प्रश्न कायम आहेत? या दिशेने पोलीसही तपास करत आहेत. 

या धक्कादायक प्रकाराने सध्या परिसर हादरून गेला आहे .