नाशिकमध्ये पुन्हा गुंतवणूकदारांची फसवणूक, ओमप्रकाश गोयंकाला अटक

ज्यादा व्याजाचं आमिष दाखवून गुंतवणुकदारांच्या फसवणुकीची मालिका नाशिक जिल्ह्यात सुरुच आहे.

Updated: May 22, 2018, 11:39 PM IST
नाशिकमध्ये पुन्हा गुंतवणूकदारांची फसवणूक, ओमप्रकाश गोयंकाला अटक title=

योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : ज्यादा व्याजाचं आमिष दाखवून गुंतवणुकदारांच्या फसवणुकीची मालिका नाशिक जिल्ह्यात सुरुच आहे. अशाप्रकारे लोकांना लुबाडणाऱ्या सिट्रस चेकइन्स आणि रॉयल ट्विंकल स्टार या कंपनीचा चेअरमन ओमप्रकाश गोयंका याला एक कोटी ७० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी नाशिक ग्रामीण आर्थिक गुन्हे शाखेनं मुंबईत अटक केलीय. त्याला ३० मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. हा राज्यातला सर्वात मोठा गुंतवणूक आर्थिक गैरव्यवहार ठरण्याची शक्यता आहे.

ओमप्रकाश गोयंका यानं लासलगाव परिसरात सिट्रस चेक इन्स आणि रॉयल ट्विंकल स्टार या कंपनीच्या शाखा सुरु केल्या. एजंटला मोठे कमिशन देऊन गुंतवणूक  केलेल्या  रकमेवर घसघशीत परतावा देण्याचे आमिष शेतकऱ्यांना दाखवलं. सुरुवातीला वेळेत मिळणारे परतावे नंतर बंद झले. एवढंच नव्हे तर हॉटेल आणि रिसॉर्ट सुरु करून लोकांकडून पैसे घेण्यात आले. अशी विविध आमिषं दाखवून फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी  कंपनीचा चेअरमन गोयंका आणि त्याच्या तीन सहकार्यावर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

पैसे परत मिळावेत यासाठी नाशिक जिल्ह्यातल्या गुंतवणूकदारांनी कार्यालयात वारंवार चकरा मारल्या. परंतु  रक्‍कम  देण्यात  टाळाटाळ  केली जात होती.  तक्रारींची वाढती संख्या पाहता ग्रामीण पोलिसांनी गोयंकाला मुंबई येथून अटक केलीये.  देशभरात या कंपनीच्या माध्यमातून ५४ विविध कंपन्या सुरु करत साडे सहा हजार कोटींचा घोटाळा करण्यात आलाय. 

या गैरव्यवहारामुळे देशभरातले एकूण अडीच लाख ठेवीदार अडचणीत आले आहेत.  ही कंपनी विविध ५४ कंपन्यांच्या माध्यमातून राज्यात अनेकांची फसवणूक करत आहे.  आता सेबी या कंपनीवर कारवाई करून गुंतवणूकदारांना दिलासा देणार का हा खरा प्रश्न आहे.