Nashik Crime : नाशिकच्या (Nashik) लाचलुचपत विभागाने (ACB) विक्रमी शासकीय अधिकाऱ्यांना आपल्या सापळ्यात अडकल्यानंतर आता चक्क एक कोटी रुपयांची लाच घेताना मोठ्या अधिकाऱ्याला ताब्यात घेतलं आहे. शासकीय ठेकेदाराचे काम केल्याच्या बदल्यात अभियंत्याने तब्बल एक कोटींची लाच घेतली आहे. हा अभियंता नगर जिल्ह्यातील (ahmednagar) असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे नगर जिल्ह्यातल्या या कारवाईने शासकीय यंत्रणेतील भ्रष्टाचाराच्या वाढत्या दरांचा खुलासा होणार आहे. राज्यातील उद्योग वाढीला सुरुंग लावणाऱ्या शासकीय यंत्रणेतील मुरलेला भ्रष्टाचार समोर येण्याची शक्यता आहे.
अहमदनगरच्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या नगर कार्यालयातील सहायक अभियंता अमित गायकवाड आणि धुळे कार्यालयातील कार्यकारी अभियंता गणेश वाघ या दोघांविरोधात एक कोटी रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत विभागाच्या नाशिक पथकाने कारवाई केली आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत विभागाच्या नाशिक पथकाने नगरमध्ये मोठी कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे. अहमदनगरच्या एमआयडीसीच्या नगर कार्यालयातील सहायक अभियंता अमित गायकवाड याला लाचलुचपतच्या नाशिक पथकाने ताब्यात घेतले आहे. या कारवाई बाबत प्रचंड गुप्तता पाळण्यात आली असून शुक्रवारी सायंकाळपासून पहाटेपर्यंत ही कारवाई सुरू होती. या प्रकरणाबाबत लाचलुचपत विभाग आणि पोलिसांकडून कोणतीही माहिती देण्यात आली नाही.
नगर जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीच्या एका बांधकामासाठी एक कोटीची लाच घेतांना अमित गायकवाड या सहाय्यक अभियंत्याला नगर पोलिसांनी पकडले आहे. औद्योगिक वसाहतीच्या मुळा धरण ते एमआयडीसी या कामाची पाइपलाइन करण्याचे 2 कोटी 66 लाख रुपये देणे बाकी होते. ते देण्यासाठी एक कोटी रुपयांची लाच मागितली होती. याचे भक्कम पुरावे मिळून आले आहेत. गायकवाड या अधिकाऱ्यास एक कोटी रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलं आहे. उद्योग विभागातील दुसरा अधिकारी गणेश वाघ सध्या धुळे शहरात कार्यरत आहे. तो सध्या फरार आहे. त्याला शोधण्याचा काम पोलीस करत असून पुण्यामध्ये गायकवाडच्या घरी छापे टाकण्यात आले आहे. त्याच्या घरातून अधिक रक्कम मिळण्याची शक्यता आहे.
नेमकं प्रकरण काय?
छत्रपती संभाजीनगर येथील कंत्राटदार अरूण गुलाबराव मापारी यांनी मापारी इन्फ्रा प्रोजेक्ट्स या कंपनीमार्फत अहमदनगरच्या एमआयडीसी वसाहतीत एक हजार मिमी व्यासाच्या लोखंडी पाइपलाइनचे काम केले होते. त्या कामाचे 1 कोटी 57 हजार 85 रुपये आणि इतर कामाचे असे 2 कोटी 66 लाख 99 हजार रुपयांचे बिल येणे बाकी होते. हे बिल मिळवण्यासाठी मागील तारखेचे बिल तयार करून त्यावर अभियंता गणेश वाघ याची सही मिळवून बिल मंजूर करून देतो, असे अमित किशोर गायकवाड याने सांगितले होते. यासाठी त्यांनी एक कोटी रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
यानंतर मापारी यांनी याबाबत लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर नाशिक लाचलुचपत विभागाच्या पथकाने सापळा रचला. शुक्रवारी,3 नोव्हेंबर रोजी सायंकाळी शेंडी बायपासजवळ पैसे देण्याचं ठरल होते. त्यानुसार अमित गायकवाड तिथे आला. त्यावेळी एसीबीच्या पथकाने कंत्राटदार मापारी याच्यामार्फत 50 हजार रुपयांच्या खऱ्या नोटा आणि इतर खोट्या नोटा असे एक कोटी रुपये गायकवाडकडे सोपवले. लाच स्विकारत असतानाच एसीबीने त्याला अटक केली.
त्यानंतर अधिकाऱ्यांसमोरच अमित गायकवाडने गणेश वाघला फोन केला. पैसे मिळाले आहेत. तुमच्या हिस्स्याची रक्कम कुठे पाठवू? असे गायकवाडने वाघला विचारले. त्यावर वाघ याने काय केले त्यांनी? अशी विचारणा केली. त्यावर गायकवाडने त्यांनी एक पाकिट दिले असेल सांगितले. यावर वाघने 'राहू दे तुझ्याकडेच. बोलतो मी तुला. ते तुलाच एका ठिकाणी पोहोचवायचे आहेत. कोठे ते सांगतो मी तुला नंतर. सध्या ठेव तुझ्या सेफ कस्टडीत,' असे अमित गायकवाडला सांगितले. दरम्यान, या संभाषणावरुन वाघ याचा यामध्ये समावेश असल्याचे समोर आलं आहे. सध्या गणेश वाघ फरार आहे.