चूक कोणाची! रस्त्यावरच्या खड्ड्यात एसटी आदळली, दरवाजा उघडला आणि प्रवासी खाली कोसळला... जागीच मृत्यू

रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे दरवर्षी शेकडो अपघात होतात. पावसाळ्यात तर रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्यच तयार होतं. पण यानंतरही कंत्राटदारांवर कोणतीही कारवाई केली जात नाही. नांदेड जिल्ह्यात खराब रस्त्यांचा असाच एक बळी गेला आहे. 

सतिश मोहिते | Updated: Jun 21, 2023, 03:29 PM IST
चूक कोणाची! रस्त्यावरच्या खड्ड्यात एसटी आदळली, दरवाजा उघडला आणि प्रवासी खाली कोसळला... जागीच मृत्यू title=

सतीश मोहिते, झी मीडिया, नांदेड : रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे मृत्यू होण्याचं प्रमाण काही केल्या थांबत नाहीए. अशीच एक दुर्देवी घटना नांदेड (Nanded) जिल्ह्यात घडली आहे. नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यात खराब रस्त्यांमुळे एसटीच्या (ST Bus) दाराचं हुक तूटून दार उघडलं गेलं आणि चालत्या एसटीतून एक प्रवासी खाली कोसळला. या घटनेत प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला. लक्ष्मण शेषेराव गायकवाड असं मृत प्रवाशाचं नाव आहे. 

काय आहे नेमकी घटना?
पावसाळा तोंडावर आल्यानंतरही अनेक ठिकाणी रस्त्यांची कामं अर्धवट आहेत. विशेषत: ग्रामीण भागात खराब रस्त्यांमुळे (Potholes) नागरिकांना समस्यांना तोंड द्यावं लागतंय. पण यानंतरही कोणतीही कारवाई केली जात नाही. लक्ष्मण गायकवाड याचाच बळी ठरले आहेत. मुखेड आगाराची एसटी बस कंधारहून मुखेडकडे प्रवासी घेऊन जात होती. या बसमधून कल्हाळी इथे राहाणारे 40 वर्षीय लक्ष्मण शेषेराव गायकवाड हे सासरवाडीला जात होते. आंबुलगा गावाच्या पुढे सावरगावपर्यंत रस्त्याचे काम रखडलं आहे. रस्त्यावर अनेक खड्डे निर्माण झाले आहेत.

खड्ड्यांचं साम्राज्य असलेल्या रस्त्यावरुन बस घेऊन जात असताना अचानक धावत्या एसटीच्या दरवाजाचा हूक तुटला. एसटी बसमध्ये गर्दी असल्याने लक्ष्मण गायकवाड बसच्या दरवाजाला खेटून उभे होते. दुर्देवाने हुक तुटून दरवाजा उघडला गेला आणि दरवाज्याजवळ उभे असलेले लक्ष्मण गायकवाड बाहेर फेकले गेले. रस्त्यावर जोरात आदळल्याने लक्ष्मण गायकवाड यांचा जागीच मृत्यू झाला. 

चार मुलींच्या डोक्यावरुन छत्र हरपले
मृत लक्ष्मण गायकवाड यांना चार मुली आहेत. मोठी मुलगी 8 वीला आहे तर 3 लहान मुली आहेत. वीट भट्टीवर रोजंदारीवर आणि मिळेल ते रोजगार करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह गायकवाड करत होते. त्यांच्या मृत्यूमुळे चार मुलीच्या डोक्यावरुन वडिलांचे छत्र हरपलं आहे. याशिवाय लक्ष्मण गायकवाड यांच्या कुटुंबात चार बहिणी, दोन भाऊ आणि आई आहे. या सर्वांची जबाबदारी लक्ष्मण गायकवाड यांच्यावर होती. लक्ष्मण गायकवाड यांच्या जाण्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. 

महाराष्ट्रातील रस्ते अपघात
महाराष्ट्रात रस्ते अपघातातले बहुतांश बळी हे खराब रस्त्यांमुळे झाल्याचं समोर आलं आहे.  महाराष्ट्र हे देशातलं सर्वात विकसित राज्य असलं तरी महाराष्ट्रातल्या रस्त्यांची अवस्था मात्र फारशी समाधानकारक नाही. कारण देशात सर्वात जास्त रस्ते अपघात होणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा वरचा क्रमांक आहे.