देवमाणूस! डॉक्टरांनी एक पैसाही न घेता जोडला मजूराचा तुटलेला पंजा; 8 तास चाललं ऑपरेशन

Nanded Doctor Reattached Wrist Broken From Hand: घटनास्थळावरुन पोलीस कर्मचारी जखमी अवस्थेतील तरुणाला आणि त्याच्या डाव्या हाताचा तुटलेला पंजा घेऊन रुग्णालयामध्ये आले. त्यानंतर पोलिसांच्या पुढाकारानेच पटापट सूत्र हलली आणि शस्त्रक्रीय यशस्वीपणे पार पडली.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jul 26, 2023, 09:45 AM IST
देवमाणूस! डॉक्टरांनी एक पैसाही न घेता जोडला मजूराचा तुटलेला पंजा; 8 तास चाललं ऑपरेशन title=
या शस्त्रक्रीयेसाठी त्यांनी एक पैसाही घेतला नाही

Nanded Doctor Reattached Wrist Broken From Hand: आजच्या जगात माणुसकी शिल्लक राहिली नाही असं अनेकदा म्हटलं जातं. मात्र नांदेडमध्ये घडलेला एका प्रकार खरोखरच माणुसकीवरील विश्वास दृढ करणार आहे. येथील एका मजुराचा हात मनगटापासून तुटला. तुटलेल्या हाताचा तुकडा पोलिसांनी प्लास्टिक बॅगमधून अपघातग्रस्त व्यक्तीबरोबर रुग्णालयात आणला. विशेष म्हणजे डॉक्टरांनी सलग 8 तास शस्त्रक्रीया करुन हा हात पुन्हा जोडला. जखमी तरुणाचं नाव त्रिशरण थोरात असं असून तो 37 वर्षांचा आहे. नांदेडमधील भाग्यनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गुरुवारी तरोडा नाक्यावर शेतकरी चौकात दोन गटात वाद झाला. दुचाकीचा धक्का लागल्याने काही गुंडांनी त्रिशरणला मारहाण केली. यावेळेस तलवारीने केलेल्या हल्ल्यात त्रिशरणचा हाताचा पंजा मनगटापासून तुटून पडला. 

पोलीस घटनास्थळी पोहोचले अन्...

या घटनेची माहिती मिळताच भाग्यनगर पोलीस स्टेशनमधील ठाणेदार सूर्यमोहन बोलमवाड यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटेही घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी प्रसंगावधान दाखवत त्रिशरणचा तुटलेला पंजा एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवला. त्रिशरण हा तुटलेला पंजा घेऊन पोलीस विष्णूपुरी येथील शासकीय रुग्णालयात गेले. मात्र या ठिकाणी ही कठीण शस्त्रक्रीया शक्य नाही असं पोलिसांना सांगण्यात आलं. त्यामुळे श्रीकृष्ण कोकाटेंच्या नेतृत्वाखालील या टीमने यशोसाई रुग्णालयातील अस्थीरोगतज्ज्ञ डॉक्टर देवेंद्र पालीवाला यांच्याशी संपर्क साधला आणि संपूर्ण प्रकाराची माहिती दिली. तसेच शस्त्रक्रीया शक्य आहे का याबद्दल विचारणा केली. त्यावेळी डॉक्टरांनी रुग्णाला घेऊन येण्यास सांगितलं.

डॉक्टरांनी एकही पैसा घेतला नाही

हातावर पोट असलेल्या त्रिशरणची शक्य ती सर्व मदत करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला. त्याला डॉ. पालीवाल यांची साथ मिळाली. त्यांनी शस्त्रक्रीय करुन त्रिशरणचा मनगटापासून तुटलेला हात पुन्हा जोडला. विशेष म्हणजे डॉ. पालीवाल यांनी या शस्त्रक्रीयेसाठी एका पैशाचंही मानधन घेतलं नाही. त्यांनी उलट त्रिशरणला मदत करण्याचं आवाहन केलं आहे.

कौतुकाचा वर्षाव

डॉ. पालीवाल, डॉ. सुशांत चौधरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तब्बल 8 तास शस्त्रक्रीया करुन मनगटापासून तुटलेला हा हाताचा पंजा पुन्हा जोडला. शनिवारी त्रिशरणच्या हाताच्या बोटांना संवेदना जाणवू लागल्याने डॉक्टरांनीही समाधान व्यक्त केलं. डॉ. पालीवाल यांच्याबरोबरच कोकाटे यांच्यावरही त्यांनी केलेल्या या कामासाठी कौतुकाचा वर्षाव होत आहे. सोशल मीडियावरही डॉ. पालीवाल यांचं अभिनंदन आणि कौतुक करणाऱ्या अनेक पोस्ट व्हायरल झाल्या आहेत.