VIDEO : उपसरपंचाची तक्रार करणाऱ्या तरुणाला मारहाण, महिलांनी काढली धिंड

Chhatrapati Sambhaji Nagar Crime : छत्रपती संभाजीनगरमध्ये भरदिवसा घडलेल्या या धक्कादायक प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. महिलांना एका तरुणाला चपलांनी मारहाण करत पोलीस ठाण्यापर्यंत धिंड काढली आहे. याप्रकरणी 14 महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आकाश नेटके | Updated: Jul 26, 2023, 10:02 AM IST
VIDEO : उपसरपंचाची तक्रार करणाऱ्या तरुणाला मारहाण, महिलांनी काढली धिंड title=

विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरच्या (chhatrapati sambhaji nagar) कन्नड तालुक्यात काही महिलांनी एका तरुणाची चपलांनी मारहाण करत धिंड काढल्याचा प्रकार समोर आला आहे. या महिलांनी तरुणाला दुकानात घुसून चपलेने मारहाण केली आणि त्यानंतर त्याची पोलीस (Chhatrapati Sambhaji Nagar Police) ठाण्यापर्यंत धिंड काढली आहे. या घटनेचा व्हिडीओही समोर आला आहे. दरम्यान, या प्रकरणी 14 महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरीकडे तरुणाने जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप (atrocity act) करत महिलांनी त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. कन्नड पोलीस ठाण्यामध्ये परस्पराविरोधी तक्रारी देण्यात आल्या असून गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

कन्नड तालुक्यातील मक्रणपूर येथील माजी सरपंच तथा उपसरपंचांची जिल्हाधिकारी यांच्याकडे अतिक्रमणाविरोधात आणि शिधा वाटप दुकानाबाबत या तरुणाने तक्रारी केल्या होत्या. त्याचा राग धरून 14 महिलांनी आपल्याला मारहाण केली असा आरोप तरुणाने केला आहे. आक्रमक झालेल्या महिलांनी तरुणाला चपलेने मारहाण करत त्याची धिंड काढली आहे. मंगळवारी भरदिवसा हा सगळा धक्कादायक प्रकार घडला. मक्रणपूर गावापासून कन्नड पोलीस ठाण्यापर्यंत महिलांनी तरुणाला चपलांनी मारहाण करत अक्षरशः धिंड काढली. 

याप्रकरणी 14 महिलांवर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी सदर तरुणाविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. कन्नड पोलीस घटनेचा अधिक तपास करीत आहेत. तरुणाला मारहाण करत पोलीस ठाण्यापर्यंत नेत असताना रस्त्यावर मोठा जमाव जमला होता. यावेळी अनेकांनी हा संपूर्ण प्रकार आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये कैद केला आहे.

शिवीगाळ केल्यामुळे मारहाण केल्याचा महिलांचा आरोप

शासकीय योजनांमध्ये कागदपत्रांवर पतीला मृत का दाखवले? असा जाब विचारणाऱ्या महिलेला तरुणाने जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्याच्या कारणावरून महिलांनी त्याची धिंड काढली. कन्नड तालुक्यातील मीराबाई पवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, बापू गवळी नावाच्या तरुणाला तू माझ्या नवऱ्याला शासकीय योजनांच्या कागदपत्रांवर मृत का दाखवले असा जाब विचारला होता. त्यावर बापूने महिलेला जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली. दरम्यान भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या शांताबाई मोरे व लताबाई सोनवणे यांनाही तरुणाने मारहाण करत शिवीगाळ केली. त्यानंतर तरुणावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आली आहे. दरम्यान मारहाण झालेल्या तरुणाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी 14 महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.