नाणार प्रकल्प कॅलेंडरची होळी तर दुसरीकडे कामगार भरतीची जाहिरात

नाणार रिफायनरी प्रकल्प कॅलेंडरची  ग्रामस्थांनी होळी केली. या प्रकल्पासाठी कामगार भरतीच्या प्रक्रियेला लवकरच सुरुवात होणार आहे.  

Updated: Jan 16, 2019, 11:43 PM IST
नाणार प्रकल्प कॅलेंडरची होळी तर दुसरीकडे कामगार भरतीची जाहिरात title=

रत्नागिरी : नाणार रिफायनरी प्रकल्पाची कॅलेंडर ग्रामस्थांना वाटण्यात आलीत. या कॅलेंडरच्या माध्यमातून प्रकल्पाची माहिती देण्यात आली होती. मात्र, संतप्त ग्रामस्थांनी या कॅलेंडरची होळी केली आणि आपला विरोध कायम ठेवला. दरम्यान, वादग्रस्त नाणार प्रकल्पासाठी कामगार भरतीच्या प्रक्रियेला लवकरच सुरुवात होणार आहे. या प्रकल्पासाठी विविध पदांसाठी आवश्यक कुशल, अर्धकुशल, कुशल कर्मचारी मिळावेत यासाठी कौशल्य प्रशिक्षण राबवण्याची जाहिरात रत्नागिरी रिफायनरी अँड पेट्रो केमिकल्स लिमिटेड या कंपनीतर्फे प्रसिद्ध केली आहे. ६७५ पदांसाठीची ही जाहिरात कंपनीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये ऑनलाइन अर्जाद्वारे अर्ज करावा लागणार असून निवडलेल्या कामगारांसाठी आवश्यक कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम कंपनीतर्फे राबवला जाणार आहे. थोडक्यात स्थानिकांचा आणि विशेषतः शिवसेनेचा कितीही विरोध असला तरी या प्रकल्पासाठी आवश्यक प्रशिक्षित कामगार भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली.

नाणारमधील ग्रामस्थांनी एकत्र येत आंदोलन

प्रस्तावित नाणार रिफायनरी प्रकल्पाविरोधात पुन्हा एकदा नाणारमधील ग्रामस्थांनी एकत्र येत आंदोलन केले. रत्नागिरी रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स लिमिटेड कंपनीकडून पाठवण्यात आलेल्या कॅलेंडर्सची होळी करत सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत हे आंदोलन करण्यात आले. यावेळी शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते. या कॅलेंडर्समधून हा प्रकल्प कसा असेल याबाबतची माहिती देण्यात आली असून प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या राजापूर तालुक्यातील १४ गावांमध्ये कॅलेंडर्स पाठविण्यात आली आहेत. त्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. कॅलेंडर्सच्या माध्यमातून आमचा स्वाभिमान विकत घेण्याचा प्रयत्न करत असाल तर तो हाणून पाडू असा इशारा उपस्थित ग्रामस्थांनी दिला.

प्रकल्प रायगडला हलवण्यावरून पुन्हा संभ्रम

नाणार रिफायनरी प्रकल्प रायगडला हलवण्यावरून पुन्हा संभ्रम निर्माण झालाय. प्रकल्प कुठे हलवावा यासंदर्भात सरकारचे निर्देश आलेले नाहीत. सरकारतर्फे कोणत्याही सूचनाही देण्यात आलेल्या नाहीत. आरआरपीसीएलच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी ही माहिती दिलीय. प्रस्तावित नाणार प्रकल्प रायगडमध्ये हलवण्याच्या हालचालींना पूर्णविरामच मिळाल्याचं बोललं जातंय. प्रकल्पासाठी रायगड जिल्ह्यात रोह्याजवळ जमिनीचा शोध सुरू असल्याची माहिती पुढे येत होती.