Crime News : अनैतिक संबंधातून मित्रानेच मित्राला संपवलं... एकाच दिवसांत दोन हत्याकांडानं हादरलं नागपूर शहर

Nagpur Crime News : बाईकला धक्का लागला म्हणून झालेल्या वादातून एकाची हत्या झाल्याची घटना ताजी असतानाच नागपूर शहर पुन्हा एकदा हादरलं आहे.

Updated: Jan 9, 2023, 06:11 PM IST
Crime News : अनैतिक संबंधातून मित्रानेच मित्राला संपवलं... एकाच दिवसांत दोन हत्याकांडानं हादरलं नागपूर शहर title=

पराग ढोबळे, झी मीडिया, नागपूर : गेल्या काही दिवसांपासून नागपूरात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे चित्र आहे. नव्या वर्षातच नागपूरात (Nagpur News) आतापर्यंत 4 हत्या झाल्याचे समोर आले आहे. रविवारीच नागपूर (Nagpur Crime News) शहरात झालेल्या हत्येचा दोन घटनांमुळे एकच खळबळ उडाली आहे. नागपूर शहरातील कळमना भागात बाईकचा धक्का लागल्याने एकाची हत्या झाल्याची घटना ताजी असतानाच आणखी एक खून झाल्याचे समोर आले आहे. अनैतिक संबधांतून (extra marital affair) मित्रानेच मित्राची हत्या केल्याचे समोर आले आहे.

अनैतिक संबंधातून मित्राला संपवलं

पत्नीशी अनैतिक सबंध असल्याचा संशयावरून आरोपीने गोळीबार करत मित्राची हत्या केली आहे. नागपूर शहरातील हिंगणाच्या श्रीकृष्ण नगर येथे रविवारी रात्री हा सर्व प्रकार घडला आहे. अविनाश घुमडे असं मृतकांचं नाव आहे. मृत अविनाश आणि आरोपी दीपक घनचक्कर उर्फ खट्या हे दोघेही मित्र होते. अविनाशचे दीपकच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध होते. याचाच राग दीपकच्या मनात होता रविवारी दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. हे भांडण हाणामारीपर्यंत गेले. त्यानंतर आरोपी दीपकने अविनाशवर दोन राऊंड फायर केले. यातच अविनाशचा  मृत्यू झाला.

मित्रानेच काढला मित्राचा काटा

अविनाश आणि दीपक या दोघांचीही गुन्हेगारी स्वरुपाची पार्श्वभूमीवर होती. गेल्या एक ते दीड वर्षांपासून ते दोघेही श्रीकृष्ण नगरात भाड्याच्या घरात राहत होते. दोघांमध्येही घनिष्ठ मैत्री असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र रात्री त्यांच्यात पत्नीसोबतच्या अनैतीक सबंधावरुन वाद होता. यातूनच अविनाशची हत्या झाली. पोलिसांनी याप्रकरणी दीपकला अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे.

 "शहरात रविवारी दोन तर नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून चार हत्या झाल्या आहेत. हिंगणा येथे झालेल्या गोळीबाराच्या घटनेतील आरोपी आणि मृत दोघेही मित्र होते. काही दिवसांपासून ते सोबतच राहत होते.  पत्नीसोबत मित्राचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन आरोपीने त्याच्यावर गोळीबार केला. आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून शस्त्र जप्त करण्यात आले आहे. झटापटीनंतर आरोपीने मित्रावर दोन राऊंड फायर केले. आरोपीला 2017 मध्ये तडीपार करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून आरोपीवर कोणत्याही गुन्ह्याची नोंद झालेली नाही. मृत व्यक्तीविरोधातही 2012 पासून कोणतेही गंभीर गुन्हे दाखल नाहीत. दुसऱ्या जिल्ह्यामध्ये दोन्ही आरोपींचे अवैध धंदे असल्याचे माहिती समोर आली होती. महिलेच्या विषयावरुन दोघांमध्ये वाद होता हे मोबाईल चॅटमधून स्पष्ट झाले आहे," असे नागपूर पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितले