पराग ढोबळे, झी मीडिया, नागपूर : गेल्या काही दिवसांपासून नागपूरमध्ये (Nagpur News) गु्न्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. अशातच एका तरुणाने 30 वर्षीय व्यक्तीची रागाच्या भरात हत्या केली आहे. नागपूरच्या (Nagpur Crime) गिट्टीखदान परिसरातील प्रेम संबंधातील बहिणीचे आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाल्याने भावाने तिच्या आधीच्या प्रियकराची हत्या केली आहे. या हत्येनंतर परिसरात एकच खळबळ उडालीय. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Nagpur Police) घटनास्थळी धाव घेतली आहे.
मृत तरुणाचे आरोपीच्या बहिणीशी प्रेमसंबंध होते. पण दोघांच्या घरच्यांनी विरोध केल्यानं दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दोघांचेही वेगवेगळ्या ठिकाणी लग्न झाले होते. दोघांचे स्वतंत्र सुखी संसार सुरू असतानाही मृताच्या मोबाईलमध्ये त्याचे तरुणीसोबतचे जुने आक्षेपार्ह व्हिडिओ होते. हेच आक्षेपार्ह व्हिडिओ मृत तरुणाच्या पत्नीच्या हाती लागले. तिने पतीला आणि कुटुंबीयांना त्या संदर्भात जाब विचारला.. याच मुद्द्यावरून मृत आणि त्याच्या पत्नीचे वाद झाले. रागाच्या मृताच्या पत्नीने सर्व व्हिडिओ परिसरातील एका व्हाट्सअप ग्रुप वर व्हायरल केले. ही माहिती मुलीच्या भावाला कळताच त्याला धक्का बसला.
या संदर्भात मुलीच्या भावाने मृत तरुणाला हटकले होते. पण मृत तरुण ऐकण्याच्या मनस्थिती नव्हता. मात्र बहिणीच्या बदनामीचा राग आरोपी भावाच्या मनात होता. आरोपीने पुन्हा मृत तरुणाच्या दुकानात जाऊन त्याला याबाबत जाब विचारला. मात्र मृत तरुणाचा त्याच्यासोबत वाद झाला. या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. रागाच्या भरात आरोपीने तरुणाच्या डोक्यात लाकडी दांडक्याने जोरात प्रहार केला. त्यानंतर आरोपीने डोक्यावर दगड टाकून तरुणाची हत्या केली. हत्येनंतर आरोपी स्वतः गिट्टीखदान पोलिसात जाऊन घटनाक्रम सांगत स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी घटनेची तक्रार नोंदवत आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे.
"आरोपीने स्वतः बिट्टी खदान पोलीस ठाण्यात हजर होऊन सांगितले की, मोबाईलचे दुकान असलेल्या मृत व्यक्तीचे आणि माझ्या बहिणीचे पूर्वी संबंध होते. त्या दोघांमधील काही व्हिडीओ देखील होते. ते व्हिडीओ मयाताने व्हायरल केले होते. बऱ्याच लोकांकडे हे व्हिडीओ होते. आरोपीने मयत व्यक्तीकडे बहिणीचे व्हिडीओ का व्हायरल केले याबाबत चौकशी केली. तसेच हे व्हिडीओ व्हायरल करु नको असे समजावून सांगितले. यातून त्यांच्यामध्ये वाद झाला आणि त्याचे रुपांतर हाणामारीत झाले. त्यानंतर आरोपीने तिथे पडलेल्या लाकडी दांडक्याने मृताच्या डोक्यात वार केला. मृतक आणि आरोपी दोघांचीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नव्हती," असे नागपूरच्या सहाय्यक पोलीस उपायुक्त विजयालक्ष्मी हिरेमठ यांनी सांगितले