Crime News: नागपूरमधील अंबाझरीमधील पांढराबोडी परिसरामध्ये एक धक्कादायक घटनाक्रम समोर आला आहे. येथील एका तरुणाची त्याच्या मित्रांनी हत्या केली असून मद्यप्राशन करत असताना दोघांमध्ये बहिणीबरोबर असलेल्या प्रेमप्रकरणावरुन वाद झाल्याने हा प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. तिघांनी मिळून या तरुणाला संपवल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा सारा प्रकार घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, मयत तरुणाचं नाव सागर नागरे असं असून तो 27 वर्षांचा होता. तर सागरच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नाव वीर थापा (18), अजित नेताम (26) आणि सुरेश यादव (25) अशी आहेत. सागर हा इतर तीन आरोपींबरोबर सोमवारी रात्री साडेदहा वाजता मद्यपान करण्याच्या उद्देशाने बंटी उइके नावाच्या मित्राच्या घरी गेला होता. घरच्या घरी सुरु असलेल्या या दारु पार्टीदरम्यान अचानक वादाला तोंड फुटलं.
पार्टी रंगात आली असताना सागरने वीरबरोबर वाद घालण्यास सुरुवात केली. "तुझ्या मामे बहिणीबरोबर माझे मागील एका वर्षापासून प्रेम संबंध आहेत. आम्ही अनेकदा शारीरिक संबंध प्रस्थापित केले आहेत," असं सागर वीरला म्हणाला. एवढ्यावरच न थांबताना सागरने वीरला डिवचण्यासाठी, "तुझी बहीण मला भेटायला रात्री माझ्या घरी येते. तुझ्या बहिणीचं माझ्यावर प्रेम असून आम्हील लवकरच पळून जाऊन लग्न करणार आहोत," असंही म्हटलं.
सागरचं बोलणं ऐकून वीरचा पार चढाला. मात्र त्यानंतरही त्याने सागरला समजावण्याचा प्रयत्न केला तरी तो त्याला बहिणीबरोबर असलेल्या प्रेमसंबंधांवरुन डिवचत राहिला. त्यामुळेच संतापलेल्या वीरने सागरला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर वीरबरोबर अन्य मित्रांनाही सागरला मारहाण केली. माझ्या बहिणीचा नाद सोड आणि हे प्रेमसंबंध तोडून टाक असं वीरने सागरला मारहाण केल्यानंतर समज देताना सांगितलं. मात्र सागरने याला नकार दिला. संतापलेल्या वीर आणि त्याच्या मित्रांनी यानंतर सागरच्या डोक्यात दगड, गट्टू घालून त्याची हत्या केली. सागर रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं पाहिल्यानंतर तिघे घटनास्थळावरुन पळून गेले.
या साऱ्या गोंधळात शेजाऱ्यांना जाग आली. कसला गोंधळ सुरु आहे हे पाहण्यासाठी ते शेजारच्या घरात गेले असता त्यांना सागर मृतावस्थेत दिसून आला. त्यांनी तातडीने अंबाझरी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन या प्रकरणी हत्येचा गुन्हा नोंदवला आहे.
दरम्यान, सागरची हत्या केल्यानंतर वीर, अजित आणि सुरेशने अंबाझरी तलावाजवळ पळून आले. त्यानंतर तिथेही या तिघांनी मद्यपान केलं. दुसरीकडे पोलिसांनी या तिघांच्या मोबाईलमधील सीम कार्डवरुन त्यांचं लोकेशन ट्रेस करत त्यांना गुन्हा घडल्यानंतर अवघ्या दोन तासांमध्ये अटक केली. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.