नोकरीचे आमिष दाखवून फसवणारी टोळी जेरबंद

एका तरुणासह ४ महिलांना अटक

Updated: Aug 21, 2018, 12:34 PM IST
नोकरीचे आमिष दाखवून फसवणारी टोळी जेरबंद title=

नागपूर : नोकरीचे आमिष दाखवून युवकांची फसवणूक करणाऱ्या टोळीला नागपूर पोलिसांनी जेरबंद केले आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये एक तरुणासह ४ महिलांचा समावेश आहे. रितेश बैरवा हा या टोळीचा मुख्य सूत्रधार असून या सर्व आरोपींना नवी मुंबई व ठाणे येथून नागपूर पोलिसांनी अटक केली आहे. नोकरी सोबतच महिलांशी मैत्रीच्या जाहिराती आरोपी वर्तमान पत्रात द्यायचे. बेरोजगारांना फसवण्यासाठी या आरोपीने पुणे येथील विविध बँकात २८ खाते उघडली होती.

ठाण्यात बसून तो हि बँक खाती संचालित करायचा. केवळ आठवी शिकलेला मुख्य आरोपी रितेश गेल्या ५ ते ६ वर्षापासून तरुणांची फसवणूक करीत होता मात्र बदनामीच्या भीतीने कोणीही पीडित समोर येत नव्हते. या कामात त्याने ज्या महिला ठेवल्या होत्या त्यापैकी ४ महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपींकडून ११ मोबाईल फोन,२५ सीम कार्ड,२७ एटीएम कार्डसह २ संगणक व १ लॅपटॉप पोलिसांनी जप्त केले असून पुढील तपास करीत आहेत.