नागपूर : राज्यात न्यायालयाच्या परिसरात हल्ल्याची दुसरी घटना घडलीय. राजधानी मुंबईपाठोपाठ आता उपराजधानी नागपूरमध्ये सत्र न्यायालयाच्या परिसराबाहेर वकिलावर कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला झालाय. यात वकील सदानंद नारनवरे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. तर विष प्राशन केलेल्या हल्लेखोराचा मृत्यू झालाय.
जिल्हा सत्र न्यायालयाच्या परिसराबाहेर वकिलावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात वकील गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर विष प्राशन केल्याने आरोपीचा मात्र मृत्यू झाला आहे. सदानंद नारनवरे असे जखमी वकिलाचे तर लोकेश भास्कर असे मृत आरोपीचे नाव आहे. आज संध्याकाळी साडेचारच्या सुमारास जिल्हा सत्र न्यायालयाच्या बाहेरील रस्त्यावर हा थरार झाला.
सदानंद नारनवरे हे रस्त्याच्याकडेला स्टूल आणि खूर्ची लावून वकिलीचा व्यवसाय करत होते. नागपूरच्या विधी महाविद्यालयातून ते निवृत्त झाले होते. आरोपी लोकेश भास्कर हा त्यांच्याकडे सहायक म्हणून काम करीत होता. आज संध्याकाळी साडेचारच्या सुमारास आरोपी लोकेश भास्करने सोबत आनलेल्या कुऱ्हाडीने नारनवरे यांच्या डोक्यावर वार केले. ज्यानंतर स्वतः देखील विष प्राशन केले. हल्ल्यानंतर परिसरातील नागरिकांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी जखमी वकील नारनवरे आणि विष प्राशन केलेल्या लोकेश भास्कर याला मेयो रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान, उपचारादरम्यान आरोपी लोकेश भास्करचा मृत्यू झाला तर जखमी वकील सदानंद नारनवरे यांची स्थिती नाजूक आहे. घटनेमागचे नेमके कारण काय हे अजून समोर आले नसून पोलीस अधिक तपास करीत आहेत.