नागपूर : नियतीचा अजब खेळ असतो. वेळ कधी कुठे आणि कशी कोणावर येईल याचा काही नेम नाही. एक अत्यंत दुर्दैवी घटना नागपुरात घडली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली. अंत्यसंस्कारादरम्यान अग्नी देताना आगीचा भडका उडाला आणि दुर्दैवी घटना घडली.
या आगीत तीन जण गंभीर होरपळले. या घटनेनंतर जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला. तर एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे.
नेमकं काय प्रकरण?
अंत्यसंस्कारावेळी अग्नी देताना आगीची भडका उडाला. यावेळी तिथे असलेले तीन जण जखमी झाले. दिलीप गजभिये आणि सुधीर डोंगरे अशी मृतकांची नावे आहेत.
गुरुवारी संध्याकाळी कामठीच्या राणी तलाव मोक्षधाम येथे स्थानिक रहिवासी सिद्धार्थ हुमणे यांचा अपघाती मृत्यू झाला होता. त्यांच्या पार्थिवावर राणी तलाव मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यासाठी हे गेले होते. त्यावेळी अग्नी देताना हा प्रकार घडला.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार अग्नी देण्यासाठी डिझेलचा वापर करण्यात आला होता. त्यामुळे डिझेलचा भडका उडाल्याने ही दुर्दैवी घटना घडल्याची माहिती मिळाली आहे.
कुठे घडली घटना?
नागपूर जिल्ह्यातील कामठी येथे ही घटना घडली आहे. राणी तलाव मोक्षधाम इथे अंत्यसंस्कारादरम्यान ही दुर्दैवी घटना घडली. यामध्ये सुधीर महादेव डोंगरे, सुधाकर खोब्रागडे आणि दिलीप घनश्याम गजभिये हे तिघेजण गंभीररित्या भाजले होते. गंभीर रित्या जखमी झालेल्या तिघांनाही उपचाराकरता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
उपचारादरम्यान दिलीप गजभिये आणि सुधीर डोंगरे यांचा रात्री मृत्यू झाला. सुधाकर खोब्रागडे अजूनही गंभीर जखमी आहे. या घटनेनंतर कामठी परिसरामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. नवीन कामठी पोलीस याप्रकरणी तपास करत आहे.