नागपुरात युट्यूब व्हिडिओ बघून १२ वर्षांच्या मुलीची आत्महत्या

यूट्यूबवर आत्महत्येचा व्हिडिओ पाहून तसा प्रयत्न करताना १२ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे.

Updated: Jun 30, 2019, 05:38 PM IST
नागपुरात युट्यूब व्हिडिओ बघून १२ वर्षांच्या मुलीची आत्महत्या title=

जितेंद्र शिंगाडे, झी मीडिया, नागपूर : यूट्यूबवर आत्महत्येचा व्हिडिओ पाहून तसा प्रयत्न करताना १२ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. शिखा राठोड असं मृत्यू पावलेल्या मुलीचं नाव आहे. नागपूरच्या तहसील पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या हंसापुरी परिसरातील ही घटना आहे. गळफास घेण्यापूर्वी शिखानं लहान बहिणीसोबत मोबाईलवर गळफास घेण्याचा व्हिडिओ पाहून त्याचं अनुकरण करण्याचा प्रयत्न केल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलं आहे. 

शिखा राठोड ही सहावीत शिकत होती. शनिवारी सकाळची शाळा करून घरी आल्यावर दुपारी तिच्या आईच्या मोबाईलवर खेळत होती. यावेळी तिच्या २ लहान बहिणीदेखील तिच्यासोबत होत्या. मोबाईलवर युट्यूब पाहताना तिला गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्या मुलींचा व्हिडीओ दिसला. या व्हिडीओ विषयी तिने आईला विचारणा केली. कामात असलेल्या आईने व्हिडिओत दाखवल्या प्रमाणे काही नसते असे सांगून दुर्लक्ष केले. मात्र चिमुकल्या शिखाच्या मनात त्या व्हिडीओ बद्दल कुतूहल निर्माण झाले.

संध्याकाळी ६च्या सुमारास दोन्ही लहान बहिणींना घेऊन ती खोलीत गेली. खोलीचे छत अगदी ६ ते ७ फुटावर असल्याने एका छोट्या स्टूलच्या साह्याने छताला पंखा लटकवण्याच्या हूकला दोरीने गळफास घेण्याचा प्रयत्न केला. यातच खालचं स्टूल पडलं आणि शिखाला गळफास लागला. हे पाहून दोन्ही लहान बहिणी घाबरल्या आणि त्यांनी आईला बोलावले. आईने दोरी कापली मात्र शिखा तोपर्यंत बेशुद्ध झाली होती. लगेच शिखाला शासकीय मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तिथे तिला तपासून डॉक्टरांनी मृत घोषित केले.