नागपुरात कोरोनाला आळा घालण्यात ‘मुंढे पॅटर्न’ यशस्वी

८० टक्के रुग्ण बरे, मृत्युदरही कमी, आता १०० हून कमी रुग्ण

Updated: May 27, 2020, 02:30 PM IST
नागपुरात कोरोनाला आळा घालण्यात ‘मुंढे पॅटर्न’ यशस्वी  title=

अमर काणे, नागपूर : राज्यात सगळीकडे कोरोनाचा कहर सुरु असताना राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये कोरोनाचा संसर्ग रोखण्यात मोठं यश आलं आहे. महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राबवलेल्या कठोर उपाययोजनांमुळे नागपूर शहरातील ८० टक्क्यांहून अधिक रुग्ण बरे झाले असून आता १०० हून कमी कोरोना बाधित रुग्ण शहरात आहेत. तर नागपूर शहरातील मृत्यूदरही २ टक्क्यांहून कमी आहे. त्यामुळे नागपुरातील कोरोनाला आळा घालणारा ‘मुंढे पॅटर्न’ लक्षवेधी ठरला आहे.

नागपुरात काय आहे कोरोना स्थिती?

नागपूर जिल्ह्यात एकून ४३३ रुग्ण आढळले होते. त्यापैकी ४११ रुग्ण नागपूर शहरातील होते. शहरातील ४११ पैकी ३३६ रुग्ण बरे झाले आहेत. तर सात जणांचा दुर्दैवाने मृत्यू झाला आहे. सध्या नागपुरात १०० पेक्षा कमी रुग्ण असून नागपूर शहरात आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कोरोनाविरुद्ध लढ्यात राबवलेल्या उपाययोजना प्रभावी ठरल्याचे दिसत आहे.

काय आहे 'मुंढे पॅटर्न'?

मुंबई, पुणे, औरंगाबादमध्ये कोरोनाने थैमान घातले असताना नागपुरात आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केलेल्या उपाययोजना, तत्परतेने घेतलेले कणखर निर्णय आणि विरोध डावलून केलेले नियोजन आणि त्याची अंमलबजावणी यामुळे नागपुरात कोरोनाचा संसर्गदर मंदावला आहे. शिवाय कोरोनातून बरे झालेल्यांची संख्याही मोठी म्हणजे ८० टक्क्यांहून जास्त आहे. कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचं हे देशातलं सर्वोत्तम प्रमाण असल्याचा दावा करण्यात येत आहे.

आयुक्त मुंढेंनी काय केलं?

कोरोनाचे हॉटस्पॉट असलेल्या भागात आयुक्त मुंढे यांनी कठोर उपाययोजना केल्या. कोरोनाचे हॉटस्पॉट असलेल्या सतरंजीपुरा, मोमीनपुरा आणि गड्डीगोदाम या भागातून सुमारे ४५०० नागरिकांना क्वारंटाईन करण्यात आलं. त्याचा परिणामही दिसून आला. सतरंजीपुरामध्ये १०४ कोरोनाबाधित रुग्णांपैकी ९९ जण कोरोनामुक्त झाले, तर एकाचा मृत्यू झाला. मोमीनपुरा या हॉटस्पॉटमध्ये १९१ कोरोनाबाधित रुग्ण होते त्यापैकी १७३ जण कोरोनामुक्त झाले आहेत, तर दोघांचा मृत्यू झाला आहे.

नागपुरात सतरंजीपुरा पहिला कोरोना हॉटस्पॉट होता. त्यानंतर मोमीनपुरा सर्वात मोठा हॉटस्पॉट ठरला. हे दोन हॉटस्पॉट आणि गड्डीगोदाम या तिसऱ्या हॉटस्पॉटमधून सुमारे साडेचार हजार जणांना क्वारंटाईन करण्यात आलं. हे परिसर सील करण्याबरोबरच सर्व आवश्यक उपाययोजना या परिसरात प्रशासनाने कठोरतेने राबवल्या. याशिवाय कोरोनाचा प्रादूर्भाव वाढू नये म्हणून कंन्टेनमेंट झोनमध्ये सर्व यंत्रणा प्रभावीपणे आणि तत्परतेने कार्यान्वीत करण्यात आल्या.

हे महत्वाचं ठरलं !

वेळीच कोरोना रुग्ण ओळखणे आणि वेळीच संस्थात्मक अलगीकरण करणे या उपाययोजना नागपुरात कोरोनाला आळा घालण्यात सर्वात महत्वाच्या ठरल्या. सुरुवातीपासूनच कोरोना रुग्णाच्या संपर्कातील येणाऱ्यांचा लवकर शोध घेऊन त्यांना क्वारंटाईन करण्यात आलं. आरोग्य पथकाला सहकार्य मिळत नसलेल्या परिसरात मास क्वारंटाईन करण्यात आलं. होम टू होम हेल्थ सर्वे सुरु करण्यात आला. कन्टेनमेंट झोनमध्ये दररोज आरोग्य तपासणी करण्यात आली आणि टीबी, कॅन्सर, गर्भवती महिलांसह हाय रिस्क रुग्णांचा आरोग्याच्या दृष्टीने पाठपुरावा करण्यात आला. या उपाययोजना कोरोनाला आळा घालण्यात यशस्वी ठरल्या.

नागपुरातील मुंढे पॅटर्नला डॉक्टर आणि पोलिसांची चांगली साथ मिळाली. आयुक्त मुंढे यांनी महापालिका प्रशासन प्रभावी करून राबवलेल्या काटेकोर उपाययोजनांमुळे नागपुरात कोरोनाला आळा घालण्यात चांगलं यश मिळालं आहे.

आयुक्त तुकाराम मुंढे काय म्हणतात?

नागपुरात राबवलेल्या उपाययोजनांबद्दल आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले, ‘आयसीएमआर, सरकार आणि आरोग्य विभागाच्या गाईडलाईन होत्या. स्थानिक स्तरावर योग्य व आवश्यक निर्णय घेतले. पहिल्या चार केसमध्ये होम क्वारंटाईन पाळलं जात नसल्याचं लक्षात आलं. त्यामुळे २५ मार्चला निर्णय घेतला आणि हाय रिस्क कॉन्टॅक्टमधील १०० टक्के संस्थात्मक विलगीकरण केले. तिथे आरोग्य पथकाला सहकार्य करत नव्हते, तिथे मास क्वारंटाईन केले. हा निर्णय अवघड होता.’

 

कोरोनाचा धोका कायम असला तरी अन्य शहराच्या तुलनेत नागपुरात कोरोनाला आळा घालण्यात यश आलं आहे हे आकडेवारीवरून स्पष्ट होते.