मुंबईः पावसाळा सुरू होऊन काही दिवस उलटत नाहीत तोच मुंबईची (Mumbai Monsoon) दाणादाण उडाली आहे. मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. तर, अनेक रेल्वे स्थानकांतून पाणी गळती सुरु झाल्याचे व्हिडिओ शेअर होऊ लागले आहेत. रेल्वे स्थानकांची (Mumbai Local) छतातून पाण्याची गळती होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळं नागरिकांना मनस्ताप होताना दिसत आहे. मात्र, आता मुंबईतील रेल्वे स्थानकांचे रुपडे पालटणार आहे. मुंबई रेल्वे विकास निगम अंतर्गंत 17 स्थानकांचा कायापालट करण्यात येणार आहे.
मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्टअंतर्गंत मुंबईतील तिन्ही मार्गावरील रेल्वे स्थानकांची दुरुस्ती कामे हाती घेण्यात आली आहेत. स्थानकात क्राउड मॅनेजमेंट ते प्रवेश आणि स्टेशन बाहेर पडण्याचा मार्ग तयार करण्यात येणार आहे. MUTP 3A अंतर्गंत 17 रेल्वे स्थानकांचा कायापालट करण्यात येणार आहे. लवकरच या कामासाठी निविदा काढण्यात येणार आहे. मात्र, ही कामे मान्सूननंतर हाती घेण्यात येणार आहे. रेल्वे स्थानकातील काम पूर्ण करण्यासाठी ठेकेदारांना 36 महिन्यांचा अवधी दिला जाणार आहे. त्याचबरोबर सीएसएमटी स्थानकांसारख्या मोठ्या स्थानकाचा पुनर्विकासाचाही प्लान आहे. त्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे.
योजनेंतर्गंत पश्चिम रेल्वे स्थानकांचे काम हाती घेण्यात येणार आहे. यात चर्नी रोड, ग्राँट रोड, जोगेश्वरी, मरीन लाइन्स, मालाड, लोअर परळ आणि प्रभादेवी या स्थानकांसाठी 50 कोटींचा निधी देण्यात आला असून ही स्थानके आता अपग्रेड होणार आहेत. त्याचबरोबर, मध्य रेल्वे मार्गावरील सँडहर्स्ट रोड, वडाळा, कुर्ला, परळ, माटुंगा, दिवा, मुंब्रा, शहाड, टिटवाळा, इगतपुरी, चिंचपोकळी, कांजूरमार्ग, विक्रोळी, भायखळा आणि विद्याविहार या स्थानकांचाही समावेश आहे.
दरम्यान, सध्या घाटकोपर रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाचे काम सुरू आहे. याच्या पहिल्या टप्प्याचे काम यावर्षी डिसेंबरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. तर, दुसऱ्या टप्प्यात जवळपास 120 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. मुलुंड आणि डोंबिवलीसाठी जवळपास 109 कोटींचा निधी, जीटीबी नगर, मानखुर्द आणि चेंबरूसाठी जवळपास 113 कोटी रुपये निधी जाहिर झाला आहे. पश्चिम रेल्वेवरील भाईंदर आणि सांताक्रुजसाठी 113.70 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. तर, नालासोपारा आणि वसई रोडसाठी 80 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. खार रोड, कांदिवली आणि मीरा रोड स्थानकांतील कामं सध्या जोमाने सुरू असून खार रोड स्थानकातील काम 60 टक्के पू्र्ण झाले आहे. त्यामुळं मुंबईकरांना लवकरच स्वच्छ आणि सुरक्षित रेल्वे स्थानकं मिळणार आहेत.