Mumbai Trans Harbour Link: बहूप्रतीक्षेत आणि बहूचर्चित मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोड नववर्षात सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 21.08 किलोमीटर लांबीचा न्हावा-शेवा सागरी सेतूचे 12 जानेवारी रोजी लोकार्पण होण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. पुलाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार असल्याची चर्चा आहे.
शिवडी- न्हावा शेवा ट्रान्स हार्बर लिंक (एमटीएचएल) म्हणजेच अटलबिहारी वाजपेयी ट्रान्स हार्बर लिंकचे काम 99 टक्के पूर्ण झाले आहे. 25 डिसेंबर रोजी पुलाचे लोकार्पण करण्यात येणार होते. मात्र पुलाचे थोडे काम बाकी असल्यामुळं लोकार्पण सोहळा पुढे ढकलण्यात आला. मात्र, आता नवीन वर्षात पूल सर्वसामान्यांसाठी खुला होण्याची शक्यता आहे. या लोकार्पण सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
12 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकमध्ये आहेत. राष्ट्रीय युवा महोत्सव नाशिकचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. त्यामुळं त्या दिवशीच पंतप्रधान मोदी यांना मुंबईत आमंत्रित करुन पुलाचे लोकार्पण करण्याचा सरकारचा मानस असल्याचे कळते. राज्य सरकारकडून पंतप्रधान कार्यालयाकडे पत्र गेल्याचे कळते आहे. 12 जानेवारी रोजी ट्रान्स हार्बर लिंकच्या लोकार्पण सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित राहावे यासाठी विनंती करण्यात आली आहे. मात्र, अजून याबाबत स्पष्ट उत्तर पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आलेलं नाहीये.
दरम्यान, येत्या 12 जानेवारीला नाशिक मध्ये राष्ट्रीय युवा संमेलनाचे आयोजन करण्यात आलय. स्वामी विवेकानंद जयंती निमित्त केंद्र सरकारच्या या महत्त्वपूर्ण उपक्रमाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणारे. या दौऱ्याच्या तयारीसाठी आज पंतप्रधान कार्यालयाची केंद्रीय समिती नाशिक मध्ये येतेय. या दौऱ्यानिमित्ताने भाजपकडून राज्यात लोकसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकले जाणार आहे.
मुंबई ट्रान्स हार्बर लिंक हा देशातील सर्वात मोठी सागरी पूल आहे. या पुलामुळं मुंबई- नवी मुंबईतील अंतर 30 मिनिटांवर येणार आहे. तसंच, मुंबई, नवी मुंबई आणि नियोजीत नवी मुंबई विमानतळ, जेएनपीए बंदर, मुंबई-गोवा महामार्ग, मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग जोडला जाणार आहे. तसंच, मुंबईहून पुण्याला पोहोचणेही सोप्पे होणार आहे. या पुलामुळं पेट्रोल-डिझेलची मोठी बचत होणार आहे.
मुंबई ट्रान्स हार्बर लिंकवरुन प्रवास करण्यासाठी नागरिकांना 500 रुपयांपर्यंत टोल आकारला जाण्याची शक्यता आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) 22 किमी सागरी मार्गासाठी एकेरी टोल म्हणून 500 रुपयांचा टोल प्रस्तावित केला आहे.