Mumbai Metro 12: कल्याण, डोंबिवली आणि तळोजा येथून नवी मुंबईला दररोज प्रवास करणाऱ्या नागरिकांचा प्रवास आता सुकर आणि आरामदायी होणार आहे. या मार्गावर राहणाऱ्या प्रवाशांसाठी MMRDAने मोठा दिलासा दिला आहे. प्रवाशांचा प्रवास जलद होण्यासाठी मेट्रो 12 आणि नवी मुंबई (Navi Mumbai) मेट्रो जोडण्यात येणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA)ने मेट्रो 12 आणि नवी मुंबई मेट्रो (Navi Mumbai Metro) जोडण्यासाठी मेट्रो12 (Metro 12) च्या डिझाइनमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं येत्या काही वर्षात प्रवासाच वेळ वाचणार आहे.
मेट्रोचे हे दोन मार्ग जोडण्यासाठी मेट्रो 12च्या मार्गावर जवळपास 700 मीटरचा विस्तार करण्यात येणार आहे. मेट्रो मार्गाचा विस्तार करुन, MMRDA तळोजाजवळील मेट्रो 12 आणि नवी मुंबई मेट्रोला जोडण्याच्या योजनेवर काम करत आहे. कल्याण ते तळोजा दरम्यान मेट्रो 12 कॉरिडॉर बांधण्यात येणार आहे, तर नवी मुंबईतील बेलापूर ते पेंढार दरम्यानचा मेट्रो कॉरिडॉर यापूर्वीच बांधण्यात आला आहे.
20.75 किलोमीटर लांबीच्या मेट्रो 12 कॉरिडॉरची पायाभरणी काही वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली होती. प्रकल्पांचे बांधकाम सुरु करण्यापूर्वी निविदा मागवण्यात आल्या होत्या. सुमारे 5,865 कोटी रुपयांच्या या प्रकल्पासाठी अनेक कंपन्यांनी निविदा दाखल केल्या होत्या मात्र, मेट्रो 12 ते नवी मुंबई मेट्रोला जोडण्याचा प्रस्ताव ठेवल्यामुळं डिझाइनमध्ये बदल करण्यात आला आहे. त्यामुळं एमएमआरडीएला निविदा रद्द करावी लागली. एमएमआरडीएच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, नवीन डिझाइनसह नवीन निविदा लवकरच काढण्यात येईल.
सध्या कल्याण. डोंबिवली आणि आसपासच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना नवी मुंबईत येण्यासाठी रेल्वे किंवा रस्तेमार्ग हा एकच पर्याय आहे. रस्त्याने नवी मुंबई गाठण्यासाठी एक ते दीड तासांचा प्रवास लागतो. तसंच, लोकल मार्गाने प्रवास करायचा झाल्यास ठाण्यात यावे लागते आणि पुन्हा दुसरी लोकल पकडून नवी मुंबईला जावे लागते. त्यामुळं हे दोन्ही मेट्रो मार्ग जोडल्याने तासांचा प्रवास अगदी काही मिनिटांत पूर्ण होणार आहे.
त्याचबरोबर ठाणे-भिवंडी-कल्याण दरम्यान प्रस्तावित मेट्रो 5 कॉरिडॉरलाही मेट्रो 12 जोडण्यात येणार आहे. त्यामुळं ठाणे, भिवंडी, कल्याण, डोंबिवली, तळोजा, बेलापूर आणि नवी मुंबईदरम्यान दररोज प्रवास करणाऱ्या हजारो नागरिकांचा धकाधकीचा प्रवास सुखकर होणार आहे.