Maharashtra Weather Alert : देशभरासह महाराष्ट्रातही पावसाची (Rainfall) संततधार सुरुच आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्राची निर्मिती होताच राज्याच्या अनेक भागांत पावसाला सुरुवात झाली आहे. अशातच विदर्भाच्या (Vidarbha) काही भागात विजांच्या कडकडाटासह वादळाची शक्यता आहे. तसेच आठवड्याभरात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, असे भारतीय हवामान विभागाने (IMD) रविवारी म्हटले आहे. तसेच मुंबईत (Mumbai) पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.
मुंबईत शुक्रवारी पहाटेपासून जोरदार पावसाने हजेरी लावली होती. मात्र शनिवारी आणि रविवारी पावसाने पुन्हा विश्रांती घेतली. त्यानंतर सोमवारी पहाटेपासूनच पावसाने थोड्या प्रमाणात जोर धरला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने वाऱ्याची चक्रीय स्थिती तयार झाली आहे. त्यामुळे राज्यात पुढील पाच दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. अशातच मुंबईत पुढील चार दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
पुण्यासाठी ऑरेंज अलर्ट
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून, पुण्यासह काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मंगळवार, बुधवारी कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. तर पुणे, रत्नागिरी, रायगड, पालघर, सातारा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अमरावतीसह मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
"पुढील 4-5 दिवस मान्सून सक्रीय राहण्याची शक्यता असून, कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल. मोसमात पहिल्यांदाच मराठवाड्यातही मुसळधार पावसाचा इशारा आहे. कोकण व विदर्भात काही भागात मुसळधार पावसाची शक्यता असून, चंद्रपूरमध्ये जोरदार पाऊस होऊ शकतो," असं हवामान विभागाच्या पुणे केंद्राचे अतिरिक्त संचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, 20 जुलै रोजी बंगालच्या उपसागरावर हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार आहे. त्यामुळे 29 जुलै रोजी त्याचे रूपांतर चक्रीय वादळात होणार आहे. ते चक्रीवादळ ओडिशा किनारपट्टीकडून पश्चिम बंगालच्या दिशेने पुढे सरकणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह मध्य भारतात पाऊस वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.