मुंबई गोवा वंदे भारत ट्रेनमुळे कोकणातील पर्यटनाला चालना मिळेल; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास

गोव्याहून निघालेली वंदे भारतचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत जोरदार स्वागत केले. तर, ठाणे स्टेशनवर सेना भाजपमध्ये क्रेडीट वॉर पहायला मिळाले.

Updated: Jun 27, 2023, 11:06 PM IST
मुंबई गोवा वंदे भारत ट्रेनमुळे कोकणातील पर्यटनाला चालना मिळेल; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास title=

Goa Mumbai Vande Bharat Express : गोव्याहून निघालेली पहिली वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन (Goa Mumbai Vande Bharat Express) मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकात(CSMT) पोहोचली. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde) वाजतगाजत ट्रेनचं आणि प्रवाशांचं स्वागत केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सकाळी या ट्रेनसह एकूण 5 नव्या एक्सप्रेसला हिरवा कंदील दाखवला होता. दरम्यान, 'वंदे भारत एक्स्प्रेस'वरून क्रेडिट वॉर सुरू झाले आहे. ठाणे स्टेशनमध्ये या ट्रेनच्या स्वागताच्या निमित्तानं भाजप आणि शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आले. त्यांच्यात जोरदार घोषणाबाजी झाली.

पर्यटनाला चालना मिळेल  

देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई आणि पर्यटनात अग्रेसर असलेल्या गोवा दरम्यान सुरू झालेल्या रेल्वेमुळे पर्यटनाचा शाश्वत विकास होण्यास आणखी मदत होईल. या ट्रेनमध्ये विविध आधुनिक सोयीसुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे कोकणवासीयांचा प्रवास सुलभ होईल. वंदे भारत एक्स्प्रेस देशात निर्मित असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकारण्यास मदत करणारी आहे. राज्यात रेल्वेच्या पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी केंद्र सरकारने 13 हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससह 123 रेल्वे स्थानकांचा विकास करण्यात येणार आहे. राज्यातील बुलेट ट्रेनसह अन्य रेल्वे प्रकल्पांच्या पूर्णत्वासाठी केंद्र सरकारच्या सहाय्याने प्रयत्न सुरू आहेत. बुलेट ट्रेनकरिता भूसंपादनाचे काम सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले. 

कोकणातून येणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसचे आगमन होत आहे ही आनंदाची बाब आहे. या रेल्वेत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध आहेत. या माध्यमातून भारत आंतरराष्ट्रीयस्तरावर पोहोचला आहे. कोकण रेल्वेसाठी कोकणवासीयांनी जमीन उपलब्ध करून दिली आहे, असे मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. 

मुंबई गोवा वंदे भारत सुरु होण्याआधीच फुल्ल 

मुंबई गोवा वंदे भारत सुरु होण्याआधीच फुल्ल झाली. गणेशोत्सवासाठी वंदे भारतच्या तिकिटांसाठी वेटिंग लिस्ट लागली आहे. मुंबई गोवा वंदे भारत खरं तर 28 जून पासून धावणार आहे. मात्र, त्याची बुकिंग आधीपासूनच सुरु झालीय. चाकरमान्यांनीही गणेशोत्सवासाठी वंदे भारतला प्रचंड प्रतिसाद दिला असून 18 सप्टेंबरला आता वेटिंग लिस्ट लागली आहे. 530 सीटर वंदे भारतची 18 सप्टेंबरची सर्वच्या सर्व तिकिटं विकली गेली आहेत. 18 सप्टेंबरला EXECUTIVE कारसाठी 20 पेक्षा जास्त वेटिंग दाखवत आहे. तर, चेअरकारची वेटिंग लिस्ट 140च्या पुढे गेली आहे. तेव्हा सणासुदीला या ट्रेनला चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.