एक्सप्रेसच्या डब्ब्यातील धक्कादायक वास्तव, अनधिकृतपणे विकली जातेय जागा

प्रवाशांकडून अनधिकृतपणे पैसे मागण्याचा प्रकार कॅमेऱ्यात कैद

Updated: Jun 18, 2019, 10:53 AM IST

प्रविण दाभोळकर, झी मीडिया, मुंबई : मुंबईतून निघणाऱ्या एक्सप्रेसमध्ये प्रवाशांकडून अनधिकृतपणे पैसे मागण्याचा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हा प्रकार वर्षानुवर्षे सुरु असून यासंदर्भात रेल्वे प्रशासनाकडे तक्रार करुनही यावर कोणतीही कारवाई होत नसल्याने प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण आहे. मुंबईतून निघणाऱ्या एक्सप्रेसमध्ये लाल शर्ट घातलेले कूली आधीच खिडकी जवळच्या जागा अडवून ठेवतात आणि नंतर प्रवाशांना शंभर रुपयांपासून पुढच्या किंमतीत ती जागा देतात असा धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. दादर रेल्वे स्थानकातील हैदराबाद एक्सप्रेसमधील हा व्हिडीओ आहे. ज्यामध्ये जनरल डब्ब्यात लाल शर्ट घातलेला व्यक्ती शंभर रुपयांनी खिडकीजवळची जागा प्रवाशांना विकताना दिसत आहे. 

एक्सप्रेसमध्ये चढण्यासाठी सर्वसाधारण माणसे रांगेत उभे राहतात. प्रवाशांच्या दोन्ही हातात सामान असते तसेच सोबत परिवारही असतो. पण अशावेळी लाल शर्ट घातलेले एक्सप्रेस प्लॅटफॉर्मवर लागण्याआधीच इथे काम करणारे इसम प्रवाशांना धक्का देत एक्सप्रेसमध्ये घुसतात. आणि खिडकीजवळच्या जागांवर बसून राहतात. थोड्यावेळाने प्रवासी एक्सप्रेसमध्ये चढू लागल्यावर आपण बसलेल्या जागा ते विकू लागतात. लांबचा प्रवास असल्याने आणि प्रवासात हुज्जत नको म्हणून अनेकदा शंभर रुपयांच्या बदल्यात ही जागा घेतली जाते. तर बऱ्याचदा अनधिकृतपणे जागा विकणाऱ्यांना प्रवाशांनी चोपही दिला आहे.

या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमधला इसमही ”इधर आ जाओ भाई...सौ-सौ रूपये सीट है” असे ओरडताना दिसत आहे. खुलेआम काळाधंदा करणाऱ्यांवर रेल्वे प्रशासनाचा जरब नाही का ? आपण एक्सप्रेसची तिकीट काढूनही यांना वेगळे पैसे का द्यायचे?? इतके वर्षे हे डोळ्यासमोर घडत असताना रेल्वे प्रशासन यांच्यावर कारवाई का करत नाही?? स्वत:च्या मालकीची नसलेली जागा खुलेआम शंभर रूपयांना विकण्याचा आत्मविश्वास कुठून येतो ? यांना नेमकं कोण पाठीशी घालतंय ? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.