Mumbai Coastal Road : कोस्टल रोडचा दुसरा बोगदा उद्यापासून सुरू होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केल्यानंतर हा बोगदा सुरू होतोय.. मरीन ड्राईव्ह पासून हाजी अलीपर्यंत प्रवास सुखकर आणि वेगवान होणारे. त्याचबरोबर उत्तरेकडेही प्रवास करणे सोपे होणार आहे. त्याचबरोबर वेळेचीही बचत होणार आहे. मरीन ड्राईव्ह ते भुलाभाई देसाई मार्ग, बॅरिस्टर रजनी पटेल चौक आणि वस्तलाबाई देसाई चौकापर्यंत अंतर्गत मार्गिकेच्या माध्यमातून प्रवास करणे सुलभ होणारे. सोमवार ते शुक्रवार हा मार्ग प्रवासासाठी खुला राहणार असून, शनिवार आणि रविवार उर्वरीत कामांसाठी बंद असणार आहे.
कोस्टल रोड 90 टक्के पूर्ण
मुंबई महानगरपालिकेच्या वतीने बांधण्यात येत असलेला महत्त्वाकांक्षी असा धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्प 90 टक्क्यांपेक्षा अधिक पूर्ण झाला असून प्रकल्पाची अंतिम टप्प्यातील कामे देखील वेगाने पूर्ण केली जात आहेत. या प्रकल्पातील मरीन ड्राइव्हपासून सुरु होणारा दुसरा भूमिगत बोगदा उत्तर दिशेने जाणाऱ्या वाहतुकीसाठी सुरू करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या मार्गावर पाहणी करणार आहेत. त्यानंतर लागलीच हा मार्ग वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे.
कोस्टल रोडचे 90 टक्के काम पूर्ण झाले असून हा प्रकल्प आता अंतिम टप्प्यात आहे. असे असले तरी, प्रकल्पातील जो हिस्सा वाहतुकीसाठी वापरात आणणे शक्य आहे, तो उपलब्ध करुन द्यावा, त्यातून वाहतुकीचा भार कमी व्हावा, मुंबईकरांचा प्रवास जलद व अधिक सुखकर व्हावा, या हेतुने टप्प्या-टप्प्याने मार्ग खुले करण्यात येत आहेत. यापूर्वी दिनांक 11 मार्च 2024 रोजी वरळी ते मरीन ड्राईव्ह अशी दक्षिणवाहिनी मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्यात आली होती. या सुरू करण्यात आलेल्या वाहतुकीचा मुंबईकरांना मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे.
आता प्रामुख्याने मरीन ड्राइव्ह परिसर ते हाजी अली परिसर असा उत्तर दिशेने प्रवासासाठी सुमारे 6.25 किलोमीटर लांबीचा मार्ग खुला होत आहे. या मार्गामध्ये अमरसन्स उद्यान व हाजी अली येथील आंतरमार्गिकांचा वापर करता येणार आहे. या आंतरमार्गिकांवरुन उतरुन किंवा प्रवेश करुन वेगवेगळ्या भागांमध्ये जाणारी वाहतूक सुलभ होईल. प्रामुख्याने बॅरिस्टर रजनी पटेल चौकातून (लोटस जेट्टी) पुढे वरळी, वांद्रेच्या दिशेने तर वत्सलाबाई देसाई चौकातून (हाजी अली) पुढे ताडदेव, महालक्ष्मी, पेडर रोडकडे जाणारी वाहतूक सुलभ होईल.