अंधेरीतील गोखले पूल कधी सुरू होणार? दिवाळीचा मुहूर्तही हुकणार, आता BMCने दिली नवी डेडलाइन

Andheri Gokhale Bridge: अंधेरीतील गोखले पूलाची एक लेन लवकरच सुरू करण्याचा प्रयत्न महापालिकेचा आहे. यासंदर्भात पालिकेने अलीकडेच एक बैठक आयोजित केली होती. 

मानसी क्षीरसागर | Updated: Oct 26, 2023, 06:47 AM IST
अंधेरीतील गोखले पूल कधी सुरू होणार? दिवाळीचा मुहूर्तही हुकणार, आता BMCने दिली नवी डेडलाइन title=
Mumbai BMC sets yet another deadline for Gokhale bridge

Andheri Gokhale Bridge: अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाबाबत मोठी अपडेट समोर येत आहे. गोखले पुलाचे काम हाती घेण्यात आल्यापासून अंधेरीत मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी होत होती. 10 ते 15 मिनिटांचे अंतर पार करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती. मात्र, आता गोखले पुलाबाबत महापालिकेने एक विशेष बैठक आयोजित केली होती. या बैठकीत 15 फ्रेबुवारी 2024 पर्यंत वाहतुकीसाठी खुली करण्यात यावी यासाठी प्रयत्न होणार आहे. 

मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह यांनी एक बैठक बोलवली होती. गोखले पुलाच्या पहिल्या गर्डर लाँचिगचे काम हे अत्यंत जिकरीचे आहे. त्यासंदर्भात ही बैठक बोलवण्यात आली होती. गोखले पुलाच्या रेल्वेवरील भागात गर्डर लॉंचिंग करण्याच्या अनुषंगाने पश्चिम रेल्वेमार्फत ब्लॉकसाठी अधिक कालावधी मिळावा,अशी विनंती बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना केली. या ब्लॉकसाठी पश्चिम रेल्वेकडूनही दुजोरा देण्यात आला आहे. 

गोखले पुलाच्या गर्डरचे लॉंचिंग करणे, गर्डर उत्तरेकडे सरकवणे आणि पूलाचा गर्डर सरकवल्यानंतर ७.५ मीटर खाली सुमारे १३०० टन वजनी आणणे हे अत्यंत कौशल्यपूर्ण काम हे राईट्स या सल्लागार कंपनीच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे. पहिल्या गर्डरचे काम हे अत्यंत जोखमीचे असल्याने हे काम अतिशय काळजीपूर्वक करण्याची जबाबदारी राईट्स या कंपनीने घेतली आहे.

पुलाच्या कामात 7.5 मीटर उंचीवरुन गर्डर खाली आणणे हा भारतातला पहिलाच प्रकल्प आहे. त्यामुळे सदर तंत्रज्ञानाच्या अंमलबजावणीच्या बाबतीत अत्यंत काळजी घेणे आवश्यक आहे. रेल्वेच्या साधारणपणे एक तासाच्या ब्लॉकमध्ये गर्डर फक्त 15 सेंटीमीटर इतकाच खाली आणता येईल. त्यामुळे गोखले पुलाच्या या अवाढव्य 1300 टन वजनी गर्डरकरिता 7.5 मीटर खाली उतरवण्याच्या कामासाठी लागणारा कालावधी हा अधिक असू शकतो. म्हणूनच रेल्वेचा ब्लॉकचा कालावधी वाढवून मिळावा, अशी विनंती महानगरपालिकेने केली आहे. 

पुलाचा गर्डर खाली आणून त्यावर सळ्या अंथरुन कॉक्रिटीकरण करण्यात येईल. पुलाचे क्युरींगचे काम पूर्ण झाल्यानंतर त्यावर मास्टिकचे काम पूर्ण करण्यात येईल. ही सर्व कामे क्रमाने झाल्यानंतरच पूल एका दिशेच्या वाहतुकीसाठी खुला करणे शक्य होईल.गोखले पुलाच्या सुरक्षेसाठी कोणतीही तडजोड करण्यात येणार नाही. तसेच एकंदरीतच पुलासाठी आवश्यक असलेल्या सर्व कामांच्या पूर्ततेचा कालावधी पाहता पूलाची एका दिशेची वाहतूक खुली करण्यासाठी 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत  कालावधी अपेक्षित असल्याचे महानगरपालिकेने म्हटलं आहे.