MSRTC ST Mahamandal News in Marathi: उन्हाळी सुट्टीत अनेकजण गावी जाण्याचा प्लॅन करत असतात. अशावेळी रेल्वे आणि एसटीला प्रवाशांची जादा पसंती असते. हंगामी काळात राज्यभरातील एसटी स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी असते. याचदरम्यान प्रवाशांना अनंत अडचणींना सामोरे जावं लागत. प्रवाशांच्या समस्या व तक्रारींचे निराकरण करण्यासाठी एसटी महामंडळाने प्रवासी मित्र ही अभिनव संकल्पना राबवली आहे. मुंबईसह राज्यातील काही प्रमुख थांब्यावर प्रवासी मित्रांची नेमणूक करण्यात आली आहे. तर दुसरीकडे बसमध्ये जागा असूनही अनेक ठिकाणी एसटी बस थांबविल्या जात नसल्याचे निदर्शनास आले आहे. याचपार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने मोठा निर्णय घेतला आहे.
उन्हाळी सुट्टीत गावी जाणाऱ्यांची संख्या पाहता एसटी महामंडळाने 15 एप्रिल ते 15 जून या कालावधीत सकाळी 8 ते 11 आणि दुपारी 4 ते रात्री 9 या वेळेत विभागीय कार्यालये आणि विभागीय कार्यशाळेतील सर्व पर्यवेक्षक आणि प्रशासकीय कर्मचारी यांची प्रवासी मित्र म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे प्रवाशांचा प्रवास हा सुखकर होणार आहे.
राज्यात दररोज सुमारे 12 हजार 600 एसटी रस्त्यावर धावतात. त्यातून सरासरी 55 लाख प्रवासी प्रवास करत असतात. यातून प्रतिपूर्ती रकमेसह दररोज 20 ते 30 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. 15 एप्रिलपासून उन्हाळी हंगाम सुरु झाला आहे. मात्र अनेकदा बसमध्ये क्षमतेपेक्षा कमी प्रवासी किंवा बसमध्ये जागा असतानाही एसटी चालक आणि वाहक थांब्यावर एसटी थांबवत नाही. सर्व्हिस रोडवर जाऊन प्रवासी चढउतार न करता उड्डाण पुलावरुन बस घेऊन जातात. प्रवाशांना नियोजित ठिकाणी न उतरवता उड्डाण पुलाच्या मागे-पुढे उतरण्यास भाग पाडतात. राज्यातील एसटीच्या प्रत्येक विभागात आणि तालुक्यात किमान 2 ते 3 थांबे आहेत, जेथे चालक-वाहक थांब्यांवर प्रवासी चढउतार न करता परस्पर बस मार्गस्थ करतात. प्रवाशांच्या गैरसोयीमुळे एसटी महामंडळाचे आर्थिक नुकसान देखील होते. याबाबत महामंडळाकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्याचा गंभीर दखल महामंडळाने घेतली असून प्रवाशांच्या सोयीसाठी महामंडळ प्रवासी मित्र ही योजना राबवित आहेत.