'शिमगो इलो रे...',होळीसाठी कोकणात जाणाऱ्या एसटी हाऊसफुल्ल, मुंबईतील 'या' आगारातून मिळेल जादा गाडी

Holi Special ST : होळीनिमित्त कोकणात जाणाऱ्यांची गर्दी पाहता एसटी महामंडळाकडून 1500 विशेष बसेस चालविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या गाड्यांचे आरक्षण देखील फुल्ल झाले आहे.  

श्वेता चव्हाण | Updated: Mar 21, 2024, 10:56 AM IST
'शिमगो इलो रे...',होळीसाठी कोकणात जाणाऱ्या एसटी हाऊसफुल्ल, मुंबईतील 'या' आगारातून मिळेल जादा गाडी title=

MSRTC Extra Buses On Holi : गणेशोत्सवाप्रमाणेत कोकणात होळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हा उत्सव साजरा करण्यासाठी मुंबईतील लाखो चाकरमानी कोकणात जात असतात. अशावेळी कोकणात जाणाऱ्या लांब पल्ल्यांच्या ट्रेन देखील अपुऱ्या पडतात. कोकणवासियांची हीच गर्दी लक्षात घेऊन एसटी महामंडळाकडून होळी विशेष बसेस चालविण्यात येणार आहे. राज्यभरातून जाणाऱ्या सुमारे दीड हजारांहून अधिक नियमित एसटी बस हाउसफुल्ल झाल्या आहेत. 

मुंबई, ठाणे, पालघर या भागांतून अनेक चाकरमानी आपल्या कुटुंबासह होळी साजरी करण्यासाठी आपल्या मूळ गावी कोकणात जाण्यासाठी धावत घेत असतात. अशावेळी गर्दीच्या हंगामात प्रवाशांची संख्या लक्षणीय वाढते. त्यातच खाजगी बस सणासुदीच्या काळात जादा पैसे आकारतात. त्यामुळे एसटी महामंडळाकडून मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतून या सगळ्या एसटी बस सुटणार आहे. सार्वधिक बस कोकणात जाणाऱ्या आहेत , अशी माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली. 

कोकणातील चाकरमान्यांना एसटी इतर कोणत्याही वाहतूक सुविधेपेक्षा जवळची वाटते. कारण ते थेट त्यांच्या वाड्या-वस्त्यांपर्यंत पोहोचवते. यंदा कोकणात जाणाऱ्या एसटीच्या 1500 बसचे आरक्षण हाऊसफुल्ल झाले आहे. अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या होळीसाठी चाकरमानी कोकणात जाण्यासाठी सज्ज झाले आहेत.  तसेच पुढील तीन दिवस कोकणात जाणाऱ्या सर्व एसटी बसेस हाऊसफुल्ल असून यातील काही एसटी बसेसचे ग्रुप बुकिंग, उर्वरित एसटी बसचे आरक्षण केले जाते. त्याचबरोबर कोल्हापूर, सांगली, सोलापूर, अहमदनगर, मराठवाडा, जळगाव, धुळे, नंदुरबार या कोकणाव्यतिरिक्त इतर ठिकाणी जाणाऱ्या नियमित एसटी बसेस हाऊसफुल्ल आहेत. मुंबई सेंट्रल, परळ, कुर्ला-नेहरू नगर, बोरिवली नॅन्सी कॉलनी, खोपट, ठाणे या बसस्थानकावर नियमित बसचे आरक्षण झाले आहे.एसटीच्या या जादा बसेस मुंबई सेंट्रल, परळ, कुर्ला, बोरिवली, ठाणे, वसई, नालासोपारा तसेच पनवेल येथील बसस्थानकांतून  खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी, मालवण आदी भागातून सोडण्यात येणार आहेत. 

आरक्षण कसे करायचे?

आगाऊ आरक्षणासाठी, एसटी महामंडळाच्या https://msrtc.maharashtra.gov.in अधिकृत वेबसाइटसह Msrtc मोबाइल आरक्षण ॲपद्वारे तिकीट आरक्षित करू शकता. याशिवाय एसटी आगरातुन या विशेष बससाठीच तिकीट आरक्षण करू शकेल. एसटी महामंडळाने सुरक्षित स्थलांतरासाठी एसटी बसमधून स्थलांतर करण्याचे आवाहन केले आहे.