दीडपट पैशाच्या अमीषाने हजारो कंगाल, करोडोंचा गंडा

पैशाच्या अमीषाने अनेकांनी दागिने गहाण ठेवून पैसे गुंतवले. मात्र काही दिवसातच......

Updated: Oct 8, 2022, 12:04 AM IST
 दीडपट पैशाच्या अमीषाने हजारो कंगाल, करोडोंचा गंडा title=

प्रफुल्‍ल पवार, झी मीडिया, अलिबाग : आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेत अलिबागमधील (alibaug) तब्‍बल 4 हजाराहून अधिक नागरिकांची कोटयवधींची फसवणूक (Cheated) करण्‍यात आली आहे. हा आकडा 25 कोटींच्‍या घरात असण्‍याची शक्‍यता आहे. नॅशडॅक (Nasdaq) या अमेरिकन शेअरमार्केट मधील नावाजलेल्या कंपनीचा वापर करुन हा हायटेक गंडा घालण्यात आला. आपली फसवणूक झाल्‍याचे लक्षात येताच अनेकांचे धाबे दणाणले आहे. (more than 4 thousand people in alibaug have been cheated of crores of rupees)

ही कंपनी सुरुवातीला 500 रुपयांच्या बदल्यात 1 हजार 200 रुपये देत होती. लोकांची हाव वाढत गेली. चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं पाहुन कंपनीने 14 दिवसात 1 लाखावर 2 लाख 40 हजार परतीची योजना काढल्यावर अनेकजण तुटुन पडले. अनेकांनी दागिने गहाण ठेवून पैसे गुंतवले. मात्र काही दिवसातच या कंपनीने वेबपोर्टल बंद केल्याचं लक्षात आलं. आपली फसवणुक झाल्याने सर्व गुंतवणुकदार बोंबाबोंब करु लागले. दिवाळी चांगली मजेत घालवण्याची स्वप्न रंगवणाऱ्या गुंतवणुकदारांवर आता आर्थिक संकट ओढावलंय.

फसवणुक झालेल्या गुंतवणुकदारांनी अलिबाग पोलीस ठाण्यात सामुहिक तक्रार दाखल केली. मात्र, पोलिसांसमोर या हायटेक फसवणुकीचा गुंता सोडवण्याचं मोठं आव्हान आहे. फसवणूक करण्यासाठी वापरण्यात आलेल्या वेबपोर्टलचा आयपी अॅड्रेस हा कॉलिफोर्नियातील आहे. तर गुंतवणुकीसाठी जे संपर्क क्रमांक वापरण्यात आलेले होते ते देखील बंद आहेत. बहुतांश वेळा व्‍हॉट्सअॅप कॉल आणि चॅटींगद्वारे गुंतवणुकदारांशी संपर्क साधण्यात आला होता. आता कोणीही प्रतिसाद देत नाहीये. त्यामुळे गुंतवणूकदारांना हात चोळत बसण्याशिवाय गत्यंतर राहिलेले नाही.

अशाच प्रकारे नॅशडॅक कंपनीच्या नावाचा वापर करुन नाशिक, शिक्रापुर, पुणे, डोंबवली आणि आता अलिबागमध्ये प्रकार घडला. अजब म्हणजे फसवणुक झालेल्यांमधील अनेक लोकांना ही बोगस कंपनी आहे, एकनाएक दिवस बंद पडेल हे चांगले माहिती होते. पण सुरुवातील हमखास मोबदला मिळाल्याने जितके दिवस दामदुप्पट मोबदला घेता येईल अशा प्रयत्नात हे गुंतवणुकदार होते.

आपल्याला पैसे मिळतात म्हणून मित्रालाही मिळवून देण्यासाठी अनेकांनी आग्रह केला. अखेर आठवड्यापुर्वी कंपनीचा वेबपोर्टल बंद झालं. नंतर सबंधितांचे सर्व फोन बंद होत गेले. त्यानंतर आपली फसवणुक झाल्याचे गुंतवणुकदारांच्या लक्षात आलं. हा सर्व प्रकार केवळ 3 महिन्यात पूर्ण झाला. या 3 महिन्यात फसवणुकीचा आकडा अंदाजे 25 कोटींवर पोहोचला असल्‍याचं म्हटलं जातंय.

पंचक्रोशीने राबवली एकत्रीत स्कीम

गुंतवणुकदारांशी संपर्क साधण्यासाठी एक व्‍हॉटसअॅप ग्रुप तयार करण्यात आला होता. अलिबाग तालुक्यातील एकट्या कुरुळ गावात असे 4 ग्रुप कार्यरत होते. या गावातील लोकांनी लगतच्या गावातील आपले नातेवाईक, मित्रमंडळी यांनाही यात सामावून घेतले. आपल्यानंतर तिघांना सहभागी करुन घेतल्यावर पहिल्या लेव्‍हलसाठी 1 हजार रुपये,  सहाजणांना सहभागी करुन घेतल्यानंतर दोन हजार रुपये मासिक पगार सुरु केल्यानंतर जास्तीत जास्त गुंतवणुकदारांना सहभागी करुन घेण्याची चढाओढ या पंचक्रोशीत सुरु झाली होती. तीन महिन्यात या स्किममध्ये अलिबाग तालुक्यात 5 हजाराहुन अधिक लोकांनी आपले पैसे गुंतवल्याचे उघड होत आहे.

दुसरा वेबपोर्टल कार्यान्वीत

फसवणुक झालेल्या गुंतवणुकदारांनी दिलेल्या माहितीनुसार सुरुवातीला गुगल पे वरुन थेट पैसे ट्रान्सफर करता येत असत, परंतु त्यानंतर युटीआर पासवर्ड वापरावा लागत असे. यासाठी दररोज संध्याकाळी बोनस जाहीर केला जात असे व्‍हॉटसअॅप मेसेज करुन कंपनीच्या भविष्यातील योजनांची माहिती दिली जात असे. हे सर्व काही दिवस सुरळीत होते. नॅशडॅक कंपनीच्या नावाने सुरु केलेला वेबपोर्टल बंद केल्यानंतर हीच पद्धत वापरुन फसवणुक करण्यासाठी एनवायएससी नावाचा नवा वेबपोर्टल सुरु करण्यात आला आहे. त्याच्या वेबलिंक येथील नागरिकांच्या मोबाईलवर येऊ लागल्या आहेत.

हा एक हायटेक गंडा आहे, मोबाईल तंत्रज्ञानातील कमतरतेचा पुरेपुर वापर करण्यापुर्वी लोकांच्या मानसिकतेचा त्यांनी पुर्ण अभ्यास केलेला आहे. कोणत्या भागातील लोकांकडे पैसे असतील याचीही या फसवणुक करणाऱ्यांकडे माहिती असून हे सर्व परदेशात राहून ऑपरेट होत असल्याचा संशय असल्याने त्या अनुषंगाने तपास सुरु असल्‍याची माहिती अलिबागचे पोलीस निरीक्षक शैलेश सणस यांनी दिली.

कोणीही प्रतिसाद देत नसल्याचे समजल्यावर फसवणुक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर आम्ही एकत्र येऊन  सायबर क्राईमकडे तक्रार दिलेली आहे. तपासासाठी आवश्यक असलेली सर्व माहिती देण्यास आम्ही गुंतवणुकदार तयार आहोत , असे स्‍वप्‍नील पाटील यांनी सांगितले.