भिंत खचली, चूल विझली! विदर्भात पावसाचा हाहाकार, अनेक संसार उघड्यावर

पावसानं विदर्भात अक्षरशः थैमान घातलंय. तुम्ही कल्पनाही करु शकत नाही, इतकी स्थिती वाईट आहे.... विदर्भातल्या गावांगावांतून, शेतशिवारातून झी २४ तासचा हा स्पेशल ग्राऊंड रिपोर्ट.... आणि हा रिपोर्ट पाहिल्यावर तरी लोकप्रतिनिधींना बुलडाणा, यवतमाळच्या पूरग्रस्तांचा पत्ता सापडेल, अशी अपेक्षा आहे. 

राजीव कासले | Updated: Jul 25, 2023, 07:08 PM IST
भिंत खचली, चूल विझली! विदर्भात पावसाचा हाहाकार, अनेक संसार उघड्यावर title=

Vidarbh Monsoon : विदर्भात पावसानं, पुरानं पुरता खेळ मांडलाय. जिथं नजर जाईल तिथं फक्त पाण्याचंच साम्राज्य दिसतंय. पाण्यानं गावंच्या गावं, शेतंच्या शेतं गिळून टाकलीयत.भिंत खचली, चूल विझली होते नव्हते गेलं अशी बुलडाणा (Buldana) आणि यवतमाळमधल्या (Yavatmal) जवळपास प्रत्येक घरातली परिस्थिती आहे. गेल्या चार दिवसांपासून पावसानं पश्चिम विदर्भाला (Vidarbha) झोडप झोडप झोडपलंय. अनेक संसार उघड्यावर आले आहेत. अंगावरचे कपडे सोडले तर हाती काहीही राहिलं नाही. बुलडाण्यातल्या संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्याला पुराचा प्रचंड मोठा फटका बसलाय. पावसामुळे नदी नाले ओढे पात्र सोडून वाट्टेल तसे वाहू लागले. त्याचा सर्वाधिक फटका नदीकाठी वसलेल्या गावांना बसला. गावातल्या शाळा बंद, वीज गायब, खायला अन्न नाही. परिस्थिती एवढी भयंकर असताना लोकप्रतिनिधी ढुंकूनही पाहायला तयार नाहीत. पावसापुढे (Heavy Rain) हतबल ग्रामस्थ रामभरोसे जगतायत. 

बुलडाण्यातल्या नदीकाठच्या गावांमध्ये शेती अशी काही उरलीच नाही. गहू, हरभरा, कापूस सडून गेलाय. एवढंच काय शेतीसाठीचे ट्रॅक्टरही जमिनीत रुतून गेलेत. सगळी पिकं हातची गेली.  शेतात उरलाय फक्त चिखल. तिकडे यवतमाळमध्येही पावसानं पुरती वाट लावली.  जवळपास अर्ध शहर पाण्यात बुडालं. नाले तुंबले. नद्यांना पूर आला नदीचं पाणी थेट घराघरांत शिरलं... घराचं अक्षरशः तळं झालंय... माणसं जीव मुठीत धरुन जगतायत. 

यवतमाळच्या वाघाडी नदीला पूर आल्यानं 50 ते 60 घरं पाण्यात गेली. गावकऱ्यांची कशीबशी सुटका झाली.  अंगावर घराची भिंत कोसळून एका महिलेचा मृत्यूही झाला. आता पूर थोडा ओसरलाय. पण घरातलं सगळं सामान वाहून गेलंय. बुलडाणा आणि यवतमाळमधली परिस्थिती प्रचंड विदारक आहे. सांगा, कसं जगायचं असा प्रश्न इथला प्रत्येक जण विचारतोय. उपमुख्यमंत्र्यांनी नुकसानग्रस्तांना 10 हजारांची मदत जाहीर केलीय. पण जिथं आभाळच फाटलंय तिथे ठिगळ कुठे कुठे लावणार, असा प्रश्न आहे.

वाशिम जिल्ह्यात पावसानं थैमान घातलंय. अनेक ठिकाणी ढगफुटी सदृष्य पाऊस पडत असल्यानं सोयाबीन, कपाशी, तूर, हळद भाजीपालासह फळबागांचे मोठं नुकसान झालंय. पावसामुळे शेतांना तळ्याचं स्वरूप प्राप्त झालंय. यामुळे शेतकरी पूरता हतबल झालाय. बुलढाणा जिल्ह्याला मुसळधार पावसाचा तडाखा बसलाय. जळगाव जामोद आणि संग्रामपूर भागातील पूर आता ओसरलाय. तीन दिवस उलटून गेलेत तरीही लोकप्रतिनीधी किंवा अधिकारी पूरग्रस्त भागाकडं फिरकले नाहीत. तर अमरावती जिल्ह्यात पावसानं हाहाकार माजवलाय. संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी शेती पाण्याखाली गेलीय. या आपत्तीमुळे जिल्ह्यात तब्बल 58 हजार 565 हेक्टरमधील पिकांचे नुकसान झालंय. या बाधित पिकांचे पंचनामे आता सुरू झाले आहे. तर पावसामुळे आतापर्यंत एक हजार 292 घरांची पडझड झालीये. यात अनेकजण दगावलेत.