उपमहापौरांनीच लातूर महापालिका कार्यालयाला ठोकले टाळे

सत्तेत असूनही उपमहापौर महापालिकेच्या कारभाराला कंटाळले.

Updated: Jun 10, 2019, 08:04 PM IST
उपमहापौरांनीच लातूर महापालिका कार्यालयाला ठोकले टाळे title=

शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर : लातूर महानगरपालिकेत गेल्या दोन वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. मात्र भाजपच्या सत्ता काळात खुद्द भाजपचेच उपमहापौर हे महापालिकेतील कारभाराला कंटाळल्याचे चित्र आहे. कारण उपमहापौर देविदास काळे यांनी महापालिकेतील नगररचनाकार कार्यालयाला टाळे ठोकलं आहे. नागरिकांच्या कुठल्याही ही समस्या या कार्यालयाकडून सुटत नाहीत, नगररचनाकार कार्यालय जनतेच्या कामासाठी पैशांची मागणी करीत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. 

लातूर महापालिका आणि त्यापूर्वीच्या नगरपालिकेत काँग्रेसची सत्ता राहिली आहे. त्यामुळे कर्मचारी हे काँग्रेसच्या काळातील मानसिकतेत असल्याचा आरोप यावेळी उपमहापौर देविदास काळे यांनी केला. नगररचनाकार कार्यालयाला टाळे ठोकलं तेंव्हा कार्यालयातील ०७ पैकी दोनच कर्मचारी उपस्थित होते. त्यामुळे ते दोन कर्मचारीही सायंकाळी उशिरापर्यंत कोंडले गेले होते. 

दरम्यान सत्ताधारी भाजपच्या उपमहापौरांनीच अशा पद्धतीने टाळे ठोकल्यामुळे याची महापालिका परिसरात जोरदार चर्चा सुरू होती. तसेच आश्चर्यही व्यक्त करण्यात येत आहे. आता महापालिका आयुक्त या प्रकरणानंतर काय भूमिका घेतात हे पाहणे गरजेचे आहे.