नागपूर : देशातील खोटा प्रचार करून समाज खिळखिळा करण्याचा प्रयत्न शहरी माओवादच्या माध्यमातून होत असल्याची टीका आज सरसंघचालकांनी केलीय. विजयादशमीच्या निमित्तानं आज नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात आयोजित उत्सवाच्या निमित्तानं भागवत बोलत होते. शिवाय राममंदिराच्या बांधकामासाठी कायदा करण्याचं आवाहनही सरसंघचालकांनी सरकारला केलं.
राम मंदिराच्या संदर्भात बोलताना मोहन भागवत यांनी आपलं मत मांडलंय. 'त्या जागेवर मंदिर होतं हे आता स्पष्ट आहे. परंतु, अद्याप राम जन्मभूमिसाठी स्थाननिश्चिती करण्यात आलेली नाही. या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप झाला नसता तर मंदिर केव्हाच उभारलं गेलं असतं. यासाठी, सरकारनं कायदे बनवून निर्माणाचा मार्ग प्रशस्त करावा. आत्मगौरवासाठी राम मंदिर उभं राहणं गरजेचं आहे' असं मोहन भागवत यांनी म्हटलंय.
शहरी माओवादा विरोधात जोरदार हल्ला चढवताना गरीब आदिवासीची माथी भडकवावून त्यांना समाजाविरोधात नेण्याची मोहीम आखली जात असल्याचं भागवतांनी म्हटलंय.
लढाई विचारांची आहे, ती विचारांनी लढली पाहिजे, असंही ते म्हणाले. संघाच्या स्वयंसेवकांना उद्देशून बोलताना, समस्या सोडवताना एकट्य़ा सरकारवर अवलंबून राहणं चुकीचं असल्याचं भागवतांनी म्हटलं.