मुंबई बर्बाद व्हायला काळ गेला, पण पुणे बर्बाद व्हायला वेळच लागणार नाही असा इशारा मनेस अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे. पुण्यात राज ठाकरे यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. जागतिक आर्किटेक्ट दिनानिमित्त 'शहर नियोजन, सौंदर्य दृष्टी आणि शाश्वत विकास' या विषयावर ही मुलाखत पार पडली. ज्या महाराष्ट्रात गाडगे महाराजांचा जन्म झाला, तिथे स्वच्छता शिकवावी लागते यासारखं दुर्दैव नाही अशी खंतही यावेळी त्यांनी व्यक्त केली. प्रत्येकाने आपापला परिसर स्वच्छ ठेवला तरी अनेक गोष्टी साध्य होतील असं मतही त्यांनी यावेळी मांडलं.
"घरातून बाहेर पडल्यावर मी एका चांगल्या शहरात जगत आहे अशी भावना निर्माण झाली पाहिजे. तरच त्या जगण्याला अर्थ आहे. मी धक्के खातोय, फुटपाथवर पाय मुरगळतोय, खड्ड्यातून गाड्या जात आहेत याला जगणं म्हणत नाही. जन्म झाला आहे म्हणून जगत आहात. आज अनेक तरुण-तरुणींना परदेशात जायचं आहे, कारण त्यांना सभोवतालचं वातावरण मिळत नाही," असं राज ठाकरे म्हणाले आहेत.
पुढे ते म्हणाले की, "मुंबई, पुण्यात प्रदूषणाचं प्रमाण प्रचंड वाढल्याची बातमी आहे. मुंबई तर जगातील पहिल्या 15 देशांच्या यादीत आहे. याचं कारण बेसुमार बांधकाम सुरु आहे. मुंबईत गेलात तर कोस्टल रोड, फ्लायओव्हर, इमारती यांचं बांधकाम सुरु आहे. रस्ते कोणासाठी वाढवले जात आहेत. मुंबई शहर आणि उपनगरातील लोकांनी लोकसंख्या वाढवलेली नाही. मग बाहेरुन ज्याप्रकारे लोक येत आहेत त्यांच्या सुख-सुविधांसाठी जे तिथे राहत आहेत त्यांचं सर्वस्व हिरावून घेत आहात. हाजीअलीला गेल्यानंतर तर समुद्र दिसत नाही".
"मी गेली 25 वर्षं पुण्यात येत आहे आणि अनेकदा माझ्या भाषणात सांगितलं आहे. मुंबई बर्बाद व्हायला एक काळ गेला, पण पुणे बर्बाद व्हायला वेळ लागणार नाही. आज पुणे कुठे राहिलं आहे. 5 पुणे आहेत. हिंजवडीचं वेगळं, नदीकाठचं वेगळं, विमाननगरचं वेगळं. पुणे राहिलंच नाही आहे. याचं कारण राज्यकर्त्यांचं लक्ष नाही", अशी टीका राज ठाकरेंनी केली आहे.
"दळण वळण आल्यानंतर सगळ्या गोष्टी बदलू लागतात, हे राज्यकर्त्यांना कळलं पाहिजे. पण त्याचा विचार होत नाही. ज्यांना याच्यात गती नाही, जे रोजच्या पाकिटावर जगतात त्यांच्यावर काय अपेक्षा करणार. मग महापालिका, राज्य सरकारकडून काय अपेक्षा करणार. कोकणातला ब्रीज पडला त्याचं बातमीपलीकडे काही झालं नाही," अशी खंत राज ठाकरेंनी व्यक्त केली.
"जेव्हा केव्हा महाराष्ट्रची सत्ता माझ्या हातात येईन तेव्हा मी संपूर्ण महाराष्ट्राचं प्लॅनिंग करायला तुमच्या सारख्या आर्किटेक्टची नेमणूक करेन. हा माझा शब्द आहे. उद्या इंजिनिअर्सच्या कार्यक्रमात गेलो तरी आर्किटेक्टच महाराष्ट्राच प्लॅनिंग करतील हेच सांगेन," असा शब्दही राज ठाकरेंनी दिला.