'भाजपाने आमच्या आदित्यवर...'; संजय राऊतांनी मानले राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला यांचे आभार

Disha Salian Case Aditya Thackeray Connection Sharmila Thackeray React Raut Reply: थेट दिशा सालियन प्रकरणाचा उल्लेख करत शर्मिला ठाकरेंना प्रश्न विचारण्यात आला होता. 

स्वप्निल घंगाळे | Updated: Dec 18, 2023, 10:43 AM IST
'भाजपाने आमच्या आदित्यवर...'; संजय राऊतांनी मानले राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला यांचे आभार title=
संजय राऊत यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना नोंदवलं मत (फाइल फोटो)

Aditya Thackeray Sharmila Thackeray React Raut Reply: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र तसेच माजी मंत्री आदित्य ठाकरे हे सध्या दिशा सालियन प्रकरणामुळे चांगलेच चर्चेत आहेत. मागील आठवड्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी या प्रकरणाबद्दल आपलं मत व्यक्त केलं होतं. शर्मिला ठाकरेंनी व्यक्त केलेल्या मतावर आता उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भारतीय जनता पार्टीचं नाव घेऊन प्रतिक्रिया नोंदवली आहे.

दिशा सालियन प्रकरण चर्चेत

राज्यातील विधानसभेचे हिवाळी अधिवेशन वेगवेगळ्या मुद्द्यांमुळे गाजत आहे. यामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणाने वादाची ठिणगी टाकली आहे. दिशा सालियन प्रकरणामध्ये आदित्य ठाकरेंची एसआयटी (विशेष तपास समिती) मार्फत चौकशी होणार असल्याचं निश्चित झालं आहे. मुंबई पोलिसांनी राज्य सरकारच्या निर्देशानुसार एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. मागील हिवाळी अधिवेशनामध्ये राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आदेशानुसार आता एसआयटीकडून आदित्य यांची आता या प्रकरणात चौकशी होणार आहे. असं असतानाच शर्मिला ठाकरेंकडे या प्रकरणासंदर्भात विचारणा करण्यात आली असता त्यांनी आदित्य ठाकरेंची बाजू घेतली होती. 

काय म्हणाल्या शर्मिला ठाकरे?

पत्रकारांनी दिशा सालियन प्रकरणामध्ये एसआयटी स्थापन केली जात असल्याचा संदर्भ देत शर्मिला यांना प्रश्न विचारला. या प्रश्नाला अगदी मोजक्या शब्दांमध्ये उत्तर देताना काकू शर्मिला यांनी पुतण्या आदित्य ठाकरे यांची बाजू घेतल्याचं पहायला मिळालं. मनसे आणि उद्धव ठाकरे गटामध्ये राजकीय मतभेद अनेकदा दिसून आले आहेत. दोन्ही बाजूच्या नेत्यांनी एकमेकांवर अनेकदा टीका केल्याचं पाहायला मिळालं आहे. मात्र दिशा सालियन प्रकरणामध्ये कुटुंब म्हणून राज ठाकरेंचं कुटुंबिय आदित्य ठाकरेंच्या पाठिशी उभे असल्याचं दिसत आहे. दिशा सालियन प्रकरणासंदर्भात एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. या प्रकरणाकडे कसं पाहता, असा प्रश्न पत्रकारांनी शर्मिला ठाकरेंना विचारला. हा प्रश्न ऐकताच क्षणाचाही विलंब न लावता शर्मिता ठाकरेंनी, "आदित्य असं काही करेल असं मला वाटतं नाही," अशी प्रतिक्रिया नोंदवली. पुढे बोलताना शर्मिला ठाकरेंनी, "चौकश्या काहीही लावू शकतात. आम्ही पण याच्यातून खूपदा गेलो आहोत," असं म्हटलं आणि त्या निघून गेल्या. काही वर्षांपूर्वी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोहिनूर प्रकरणामध्ये चौकशीसाठी सक्तवसुली संचलनालयाची नोटीस आली होती. राज यांची ईडीच्या कार्यालयामध्ये सखोल चौकशीही झाली होती. याच्याशीच शर्मिला यांच्या या वक्तव्याचा संदर्भ जोडला जात आहे.

संजय राऊत यांची प्रतिक्रिया

शर्मिला ठाकरेंच्या  "आदित्य असं काही करेल असं मला वाटतं नाही," या प्रतिक्रियेबद्दल आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर संजय राऊत यांनी, "मी त्यांचा आभारी आहे. आदित्यवर सर्वांचा विश्वास आहे. भारतीय जनता पक्षाने आमच्यावर आणि आमच्या आदित्यवर असे कितीही आरोप केले तरीसुद्धा अशाप्रकारच्या घाणेरड्या आरोपांवर कोणी विश्वास ठेवणार नाही. मी शर्मिला ठाकरे यांचा आभारी आहे," असं संजय राऊत म्हणाले.