नशेत असताना अग्निशमन दलाला फोन केला, कारण ऐकून अधिकाऱ्याचे डोकंच फिरलं

Mumbai News: वरळी येथील एका 33 वर्षांच्या तरुणाने अग्निशमन दलाला फोन करुन खोटी माहिती दिली. या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Dec 18, 2023, 09:22 AM IST
नशेत असताना अग्निशमन दलाला फोन केला, कारण ऐकून अधिकाऱ्याचे डोकंच फिरलं title=
Worli Man Drunk Dials Fire Brigade To See What Happens arrested

Mumbai News Today: अग्निशमन दलाला खोटी माहिती दिल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी एका 33 वर्षांच्या व्यक्तीला अटक केली आहे. वरळी येथील हा रहिवासी असून त्याने अग्निशमन दलाला फोन करुन खोटी माहिती दिल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.

शनिवारी दुपारी वरळी विभागातील अग्निशमन कक्षात भायखळा अग्निशमन कंट्रोल रुमकडून फोन आला. लोअर परळ आणि वरळी दरम्यान अशलेल्या पांडुरग बुधकर मार्गावरील SRA येथील महालक्ष्मी इमारतील सी विंगला आग लागल्याची माहिती देण्यात आली. तसंच, परिस्थिती बिकट असल्याचंही सांगण्यात आले. फोन आल्यानंतर वरळीतील अग्निशमन दल तातडीने निघाले. 

कंट्रोल रुमला अलर्ट कॉल आल्यानंतर वरिष्ठ अधिकारी हरिश्चंद्र नारकर यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार करण्यात आले व सहा अग्निशमन गाड्या घेऊन हे पथक घटनास्थळी पोहोचले. मात्र तिथे पोहोचल्यानंतर कुठेच आगीची घटना घडल्याचे दिसले नाही. स्थानिकांकडे चौकशी केल्यानंतर त्यांनीहे इथे कुठेच आग लागली नसल्याचे सांगितले. त्यामुळं एकच गोंधळ निर्माण झाला. नारकर यांनी पुन्हा भायखळा कंट्रोल रुमला फोन केला व कोणीतरी खोटी माहिती दिल्याचे सांगितले. तसंच, फोन कोणी केला याबाबत माहिती काढण्यास सांगितले. 

नारकर यांनी फोन करणाऱ्या व्यक्तीला फोन केल्यास त्याने दिलेले उत्तर एकून ते देखील चक्रावले. अग्निशमन दलाला आग लागल्याची खोटी माहिती का दिली? यावर त्या व्यक्तीने मी सहजच फोन केला. फोन केल्यानंतर काय घडतं हे पाहत होतो, असं उत्तर या व्यक्तीने दिले आहे. त्यानंतर नारकरांनी त्याव्यक्तिविरोघात वरळी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी त्याला त्याचे नाव विचारताच त्याने शिवराज उमेश अरुणथाथीयार असं सांगीतलं असून तो महालक्ष्मी बिल्डिंगयेथील रहिवासी आहे. 

वरिष्ठ पोलीस अधिकारी रविंद्र काटकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवराज दारूच्या नशेत होता तेव्हा त्याने कंटोल रुमला फोन केला होता. तो नशेत होता आणि त्याला फक्त दुसऱ्यांना त्रास द्यायचा होता. यासाठी त्याने हे सगळं केलं आहे. आम्ही त्याला ताब्यात घेतलं आहे. 

अरुणथियार यांच्यावर कलम 182 (खोटी माहिती पसरवणे), 505 अंतर्गत आरोप लावण्यात आले आहेत. तसंच, त्याला पोलिसांनी ताब्यातही घेतलं आहे.