Raj Thackeray On Mumbai Goa Road Condition: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज पनवेलमधील कार्यक्रमामध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांना आंदोलन सुरु करण्याचं आव्हान केलं आहे. असं आंदोलन करा की भविष्यात कोणालाही असे खराब रस्ते बनवताना भीती वाटली पाहिजे आपल्या आंदोलनाची, असं राज ठाकरे म्हणाले. राज ठाकरेंनी वर्षानुवर्ष खराब रस्ते देऊनही लोक त्याच लोकप्रतिनिधींना कसे निवडून देतात असा प्रश्न पडतो असंही म्हटलं. राज ठाकरेंनी मुंबई-गोवा महामार्गाच्या सध्याच्या स्थितीसाठी वारंवार त्याच त्याच लोकांना निवडून देणाऱ्यांना दोष दिला आहे. तसेच राज यांनी हे सर्व सुधरण्यासाठी एकदा माझ्या हाती सत्ता देऊन बघा असं आवाहनही केलं.
"आज रस्त्यांचा विषय आहे. मी हिरवा झेंडा दाखवण्यासाठी आलो आहे. या आंदोलनासाठी मी विचार करत होतो येताना. मला अजून कळलेलं नाही जे चंद्रयान गेलंय चंद्रावर. काय उपयोग आहे आपल्याला तिथे जाऊन खड्डेच बघायचे आहेत. ते जर महाराष्ट्रात सोडलं असतं तर खर्चही वाचला असता. महाराष्ट्रातील कोकण नाही मुंबई, नाशिक आणि अनेक रस्त्यांची हीच अवस्था आहे," असं म्हणत राज यांनी संताप व्यक्त केला. "मला फक्त या राज्यातल्या लोकांचं कौतुक वाटतं मला. हे खड्डे आज पडलेले नाहीत. 2007 साली की 2008 साली या मुंबई-गोवा रस्त्याचं काम सुरु झालं. काँग्रेसचं सरकार होतं. मग शिवसेना-भाजपाचं सरकार आलं. मग कोणाकोणाचं सरकार आलं. त्याला काही आकार नव्हता म्हणून म्हणतोय," असा टोला राज यांनी आपल्या खास शैलीत महाविकास आघाडी सरकारला लगावला.
"एवढी चांगली सरकारं आल्यानंतर देखील. एवढ्या खड्ड्यांमधून जाताना त्याच त्याच पक्षाच्या लोकांना मतदान कसं करतात याचं मला आश्चर्य वाटतं. आम्ही खड्ड्यातून गेलो काय किंवा खड्ड्यात गेलो काय. महाराष्ट्रातील जनतेला कधीच असं वाटतं नाही का या लोकांना एकदा धडा शिकवावा. या लोकांना एकदा घरी बसवावं. निवडणुकीच्या तोंडावर येऊन आश्वासनं देतात. घोषणा करतात. जिंकून आल्यानंतर म्हणतात करु करु पुढे करु म्हणतात," असं राज यांनी राजकारण्यांवर निशाणा साधताना म्हटलं.
"पक्ष म्हणून तुम्हाला या आंदोलनामध्ये उतरावं लागेल. पनवेलपासून सावंतवाडीपर्यंत यात उतरावं लागेल तुम्हाला. जिथे गरज असेल तिथे लोकांना सहकार्य करा. लोकांना त्रास झाला पाहिजे नाही. आंदोलन असं झालं पाहिजे की तात्काळ सरकारने पावलं उचलून लोकांना चांगला रस्ता मिळाला पाहिजे. माझं मनसे सैनिकांना आवाहन आहे की संपूर्ण कोकणावर लक्ष ठेवा. कोण जमिनी पळवतं आपल्या गोष्टी पळवतात त्यावर लक्ष ठेवा. कोकणात पण हिंदी बोलू लागतील. कोकणचं रुप जपलं पाहिजे, सौंदर्य जपलं पाहिजे. असा प्रदेश सर्वांना मिळत नाही. या पुढे रस्ते करताना या सरकारला अशाप्रकारचं आंदोलन झालं होतं याची भीती वाटाली पाहिजे. मी तुमच्याबरोबर आहेच. जिथे गरज लागेल तिथे हक्काने बोलवावं. लवकरात लवकरात आंदोलनाला सुरुवात करा. सरकारला जाग यावी आणि लवकरच चांगला रस्ता मिळो अशी आशा व्यक्त करतो," असंही राज म्हणाले.
राज्यामध्ये सगळं राजकारण घडत असताना "तुम्हाला ज्या प्रकाराचा त्रास होतोय. रस्त्यांचा, वाहतुकीचा, अगदी लहान मुलांच्या प्रवेशापासून त्रास होतोय तरी त्याच त्याच लोकांना मतदान करतायत. मला कळलं नाही जनतेला काय हवंय? त्याच त्याच लोकांना मतदान होतंय. तुम्हाला तीच लोक हवी असतील तर तुमचं तुम्हाला लखलाभ. पण या सगळ्या गोष्टी सुधरवायच्या असतील तर एकदा माझ्या हातात गोष्टी देऊन बघा," असं आवाहन राज ठाकरेंनी केलं. "दरवेळेला पावसाळा आला की टीव्हीचे लोक कुठे खड्डे पडले ते दाखवत बसतात. नाशिकमधल्या रिपोर्टर्सकडे फुटेज मागवतात पण रस्त्यांवरील खड्ड्यांवरील फुटेजच नाहीत. पत्रकार म्हणतात, आहो, दाखवून कुठून खड्डे नाहीतच. आपण रस्तेच असे बांधले होते. म्हणजे रस्ते चांगले बांधले जाऊ शकता," असं राज म्हणाले.
"आपलं यान चंद्रावर जाऊ शकतं रस्ते नाही होऊ शकतं. महाराष्ट्रात चांगले रस्ते होतं नाही. मुंबई-नाशिक प्रवासाला 8-8 तास लागतात. गरोदर स्त्रीया, लघवीला लागली तर कुठे जाणार स्रियांचे किती हाल. आमचे हाल झाले तर हाल झाले पण त्यांना मतदान करणार कुठला प्रकार आहे कोणास ठाऊक" असं म्हणत राज यांनी आश्चर्य व्यक्त केलं. "मी काही दिवसांपूर्वीच नितीनजींना फोन केला होता. म्हटलं त्या समुद्धी महामार्गावर अजून फेन्सिंग टाकलेलं नाही. त्यावर हरणं, बकऱ्या, गायी येताय. स्पीडने जातात लोकं. अचानक गाय, बकरी आली तर करणार काय? 400 दिवस झालेत रस्ता सुरु करुन 350 माणसं मृत्यूमुखी पडली आहेत. आम्ही फेन्सींग लावणार नाही. पण टोल लावणार. टोल सुरु झाला. इथे पैसे भरा आणि मरा. अशी सरकारं असतात का हो? एका माणसाचा फोन येईल. त्याच्याशी बोलता. मी डिटेलमध्ये बोललोय त्यांच्याशी आता पाहू पुढे काय होतंय" असं राज म्हणाले.
"मुंबई-गोवा महामार्गाबद्दल फडणवीसांशी बोललो. ते म्हणाले नितीनजींशी बोलून घ्या. मी त्यांच्याशीही बोललो. मुंबईवरुन रत्नागिरीला जायचं असेल तर यू-टर्न मारुन जावं लागतंय. मुंबईवरुन पुण्याला, पुण्यावरुन साताऱ्याला आणि सातऱ्यावरुन खाली या. जेव्हा रस्ता बनत नव्हता तेव्हा जास्त चांगला होता. लोक पोहचत तरी होते," असा टोला राज ठाकरेंनी लगावला. "या रस्त्यावर किती खर्च झाला आहे माहितीये का? आतापर्यंत मुंबई-गोवा महामार्गावर यावर खर्च झालेला पैसा 15566 कोटी रुपये इतका आहे. रस्ता झालेला नाही. मी नितीनजींना फोन केला तेव्हा म्हणालो राज्याकडून होत नसेल तर केंद्राकडून बघा. मला म्हणाले मी लक्ष घातलं पण कंत्राटदार पळून गेलेत. काहीजण कोर्टात गेलेत. मी म्हटलं हा काय प्रकार आहे. या सगळ्या गोष्टींमागे काही कारण तर नाही ना? यामागे कोणाचं काही काम तर सुरु नाही ना?" अशी शंका राज यांनी उपस्थित केली.
"कोकणामधल्या जमिनी धडाधडा चालल्यात इतरांच्या हातात. नाणार प्रकल्पाला जेव्हा विरोध झाला. मी सांगतोय याचा विचार करा नुसतं ऐकू नका. नाणार प्रकल्प रद्द होतोय म्हटल्यावर बारसू प्रकरण आलं. 5-5 हजार एकरांच्या जमिनी कोणी घेतल्या? कोण काम करतंय. एवढे जमिनीच्या पट्टेच्या पट्टे विकत घेतले जात आहे. आपलीच लोक आपल्या लोकांना फसवून दुसऱ्यांच्या घशात जमिनी घालत आहेत. नितीन गडकरी, मुख्यमंत्र्यांनी मुंबई गोवा महामार्ग 2024 पर्यंत लोकांसाठी खुला होईल असं सांगितलं आहे. आनंद आहे," असं राज म्हणाले.
"2024 ला रस्ता सुरु होईल पण आताच्या गणपतीचं काय. आतापर्यंत या मार्गावर 2500 माणसं गेल्या 10 वर्षात मृत्यूमुखी पडली आहेत. याचं काय कारण? आम्ही गावी जात होतो, सहज फिरायला जाताना अपघात. गेले घरचे. टायर फुटतायत, गाड्या वेड्यावाकड्या होतात. पण काही नाही सगळे ढिम्म. याचं एकच कारण आम्ही कसेही वागलो, काहीही केलं कसेही रस्ते केले तरी भलत्या विषयावर हे आपल्याला मतदान करुन मोकळे होणार. निवडणुकीच्या तोंडावर काहीतरी काढून मतं मिळवतात. हा धंदा आहे. एखादा रस्ता 20-25 वर्षांसाठी चांगला केला तर पैसे खायचे कसे? तो 6 महिन्यात खराब झाला पाहिजे. नवं टेंडर, नवे पैसे, नवं कंत्राट, नवे टक्के असं सुरु आहे," असा टोला राज यांनी लगावला.
"2024 पर्यंत रस्ता पूर्ण होईल पण पुढे काय? पुढचं काय? आज जाऊन पुणं बघा. मी अनेकदा पुण्यात सांगितलेलं की मुंबई बर्बाद व्हायला काळ गेला मोठा. पुणे बर्बाद व्हायला वेळ नाही लागणार. कारण याची आखणी नाही कोणत्या गोष्टींची. आपल्याकडे टाऊन प्लॅनिंग नाही नुसतं डेव्हलपमेंट प्लॅन यतो. 5-5 पुणे झालेत. तिथे गुदमदरलेला कोण आहे मराठी माणूस आहे. कोण येतंय, जातंय कसला पत्ता नाही," असंही राज म्हणाले.
"2023 ला गोव्यात कायदा केला. गोव्यातली शेतजमीन सहज कोणाला मिळणार नाही. घ्यायची असेल तर तिथे तुम्हाला शेतीच करावी लागेल. इतर व्यवसाय करता येणार नाही. राज्य कोणाचं आहे गोव्यात? भाजपाचं. भाजपाचे मुख्यमंत्री तिथे असा कायदा करतात. त्यांचं स्टेटमेंट आहे, "आम्ही गोव्याचा गुरुग्राम किंवा छत्तीसपूर होऊ देणार नाही." म्हणजे गोव्याचे मुख्यमंत्री उत्तरेतून येणाऱ्यांना आम्ही जमिनी देणार नाही असा याचा अर्थ होतो," असं म्हणत राज यांनी कोकणातील जमिनी खरेदी विक्रीसंदर्भात भाष्य केलं.