'अदानींकडे असं काय आहे की...'; 'टाटां'चा उल्लेख करत राज ठाकरेंचा रोखठोक सवाल

MNS Chief Raj Thackeray Slams Adani Group: "धारावीमध्ये मोठं आंदोलन करण्यात आलं. याबद्दल तुमचं काय मत आहे?" असा प्रश्न राज ठाकरेंना विचारण्यात आला असता त्यांनी अदानी ग्रुपवरच निशाणा साधला.

स्वप्निल घंगाळे | Updated: Dec 18, 2023, 12:29 PM IST
'अदानींकडे असं काय आहे की...'; 'टाटां'चा उल्लेख करत राज ठाकरेंचा रोखठोक सवाल title=
प्रसारमाध्यमांशी बोलताना राज ठाकरेंचं विधान

MNS Chief Raj Thackeray Slams Adani Group: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील 22 लोकसभा मतदारसंघातील आढावा घेण्यासाठी मुंबई पक्ष पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना राज ठाकरेंनी धारावी पुनर्विकास प्रकल्पाबद्दल बोलताना थेट अदानी समुहावर निशाणा साधताना अप्रत्यक्षपणे सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं.

धारावीबद्दल राज ठाकरेंनी थेट अदानी समुहासंदर्भात उपस्थित केला प्रश्न

मनसेच्या बैठकीनंतर राज ठाकरे पत्रकारांशी संवाद साधण्यासाठी आले असता त्यांना, "धारावीमध्ये मोठं आंदोलन करण्यात आलं. याबद्दल तुमचं काय मत आहे?" असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना राज ठाकरेंनी, "मोठा प्रकल्प मुंबईमध्ये येतोय. हा प्रकल्प परस्पर अदानींना का दिला? अदानींकडे असं काय आहे की विमानतळ तेच हाताळू शकतात. कोळसाही तेच हाताळू शकतात. एवढा मोठा प्रकल्प आला. टाटा वगैरेसारख्या एवढ्या मोठ्या कंपन्या आहेत. त्यांच्याकडून टेंडर मागवायला, डिझाइन मागवायला हवं होतं. तिथे काय होणार आहे कळायला हवं होतं. पण ते झालं नाही," असं म्हणत अदानींना हा प्रकल्प देण्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केले.

धारावी प्रकल्पाला पाठिंबा आहे की विरोध?

तुमचं या प्रकल्पाला समर्थन आहे की विरोध आहे? असं राज ठाकरेंना विचारण्यात आलं. त्यावर उत्तर देताना राज ठाकरेंनी, "मी बीबीडी चाळीत गेलो होतो तेव्हा पण म्हणालो होतो की अशा जागी ओपन स्पेस लागते. किती शाळा होणार तिथे, किती कॉलेज होणार? रस्ते किती होणार? इमारतीत राहणारी माणसं किती? टाऊन प्लॅनिंग नावाची काहीतरी गोष्ट सांगावी लागते की नाही. एरिया घ्यायचा आणि सांगायचं की अदानींना देऊन टाकला. असं थोडी असतं?" असं म्हणत प्रकल्पाच्या कामाबद्दल नाराजी व्यक्त केली.

बैठकीमध्ये निवडणुकीसंदर्भात नेमकी काय चर्चा झाली?

राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये काय चर्चा झाली याबद्दलही भाष्य केलं. आमची आज जी बैठक झाली त्यामध्ये लोकसभाच्या निवडणुकीसंदर्भात कोणते मतदारसंघ कसे लढवावेत याबद्दलची चर्चा झाली. पुढल्या वर्षी निवडणुका जाहीर झाल्यावर ते ठरवू, असं राज ठाकरे म्हणाले.

'मेरी मर्जी' गाण्याप्रमाणे कारभार

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांसंदर्भात राज ठाकरेंना नियोजनाबद्दल विचारलं असता त्यांनी, "त्या निवडणुका 2025 मध्ये होतील. कारण सध्या नियम, निवडणूक आयोग असं काही अस्तित्वात नाहीच आहे. ते गोविंदाचं गाणं आहे ना 'मेरी मर्जी' तसा कारभार सुरु आहे," असा खोचक टोला लगावला.