Raj Thackeray On Maharashtra Reservation: महाराष्ट्र नवनिर्माण सेना आगामी विधानसभा निवडणुकीत 225 ते 250 जागा लढवणार असल्याची घोषणा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केली. विधानसभेच्या निवडणुची तयारी त्यांनी सुरु केली असून राज ठाकरे सध्या सोलापूर दौऱ्यावर आहेत. येथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी आरक्षण मुद्द्यावर भाष्य केले. या महाराष्ट्रात इतक्या गोष्टी मुबलक प्रमाणात आहेत की तिथे आरक्षणाची गरजच नाही. पुणे, नागपूर अशा ठिकाणी फ्लायओव्हर वैगेरे सुविधा का होतात? मुळच्या लोकांसाठी नाही होत. बाहेरुन आलेल्या लोकांसाठी होतात. ठाणे हा जगातील एकमेव जिल्हा आहे जिथे 7 ते 8 महानगरपालिका आहेत. ही लोकसंख्या काय ठाण्यातील लोकांनी वाढवली? बाहेरुन येणाऱ्यांचा लोंढा खूप मोठा आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांकडे लक्ष देण्यास सरकारकडे वेळ नाही. यूपी बिहारला नोकऱ्यांच्या जाहिराती येतात पण महाराष्ट्रातील रोजगाराकडे लक्ष देण्यास सरकारला वेळ नाही. गेली अनेक वर्षे असेच सुरु आहे. आता बेरोजगारांची यादी येत नाही. महाराष्ट्राला आरक्षणाची गरजच नाही. सर्वात आधी इथल्या मुलांना प्राधान्य द्या, असे राज ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्रमध्ये आरक्षणाची गरजचं नाही इतक्या मुबलक गोष्टी आहेत. आपला सर्वाधिक पैसा हा बाहेरच्या लोकांवर खर्च होतोय. ठाणे जिल्हा हा देशातील हा एकमेव जिल्हा जिथे 7-8 महापालिका आहेत. मग इथली लोकसंख्या ठाण्यातील लोकांनी वाढवली का? ही लोकसंख्या बाहेरच्या लोकांनी वाढवली. आपला पैसा त्यांची व्यवस्था करण्यातच जातो,आपल्या नोकऱ्याच्या जाहिराती युपी बिहारमध्ये येतात. मग आपल्या तरुणांना हे कळत नाही, अशी खंत यावेळी राज ठाकरेंनी बोलून दाखवली.
आपल्या तरुणांना नोकऱ्या नाहीत. आता तर यादी ही यायची बंद झाली आहे. मी देश तोडायचं म्हणत नाहीये. आधी इथल्या तरुणांना नोकऱ्या द्या नंतर बाहेरच्या तरुणांना द्या. स्पोर्ट्स बजेट आलं त्यात ही गुजरात आणि युपीला प्राधान्य दिलं, असं कसं चालेल? प्रधानमंत्री यांनी सर्वानी सारखं पहिले पाहिजे. पंतप्रधान मोदींनी सर्व राज्य समान पद्धतीने पाहिली पाहिजेत. एखादा नवा प्रकल्प आला की गुजरातला न्यायचा, काही नवं आलं की गुजरातला न्यायचं हे करणं बंद करावं. उद्या मराठी पंतप्रधान झाला आणि त्याने केवळ महाराष्ट्रातच अशा सुविधा आणल्या तर मी त्याला विरोध करेन. यावर आक्षेप घ्यायचे नाहीत का? नरेंद्र मोदींच्या चांगल्याला चांगल म्हणणार, वाईटाला वाईट म्हणणार, असे म्हणत त्यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली.
मनसेला मिळालेली मत टिकत का नाहीत? असा प्रश्न त्यांना पत्रकारांनी विचारला. यावर बोलताना आता जन्माला आलेला पक्ष आहे. अवघी 18 वर्षे झाली. कॉंग्रेसची स्थिती पाहा, काय झालीय. लाटा येत असतात, लाटा जात असतात. विधानसभेला काय होतंय ते पाहा, असे ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर मॅच फिक्सिंग केल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जातो. या मॅच फिक्सिंगच्या टिकेवरही योग्यवेळी उत्तर देणार असे राज ठाकरे म्हणाले.
धार्मिक स्थळांवरचा स्पीकर बंद करण्याची मागणी काही अंशी पूर्ण झाली. तुमचे सरकार आल्यावर मागणी पूर्ण होणार का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर बोलताना पूर्णपणे बंद होणार, असे उत्तर त्यांनी दिले.
400 पार झाले की आम्ही संविधान बदलणार हे नेरेटिव्ह भाजपच्याच नेत्यांनी सेट केल्याचे राज ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्रमध्ये आरक्षणाची गरजचं नाही, या राज ठाकरेंच्या विधानाबद्दल वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना तो त्यांचे म्हणणे आहे. माझी यात्रा कुठपर्यंत आली असा प्रश्न तुम्ही त्यांना विचारता का? असा प्रतिप्रश्न त्यांनी केला.