स्पीड बोट बंद पडल्याने भर समुद्रात अडकले उदय सामंत; प्रसंगावधानामुळे वाचले प्राण

Uday Samant :  माजी मंत्री आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्या गाडीचा अपघात झाल्याची घटना ताजी असतानाच मंत्री उदय सामंत यांची बोट भर समुद्रात बंद पडली. मात्र यातून उदय सामंत हे थोडक्यात बचावले आहेत.

Updated: Jan 21, 2023, 09:34 AM IST
स्पीड बोट बंद पडल्याने भर समुद्रात अडकले उदय सामंत; प्रसंगावधानामुळे वाचले प्राण title=

Uday Samant : गेल्या काही दिवसांपासून राज्यात राज्याच्या राजकारणातील महत्त्वाच्या व्यक्तींच्या अपघातांचे सत्र सुरुच असल्याचे पाहायला मिळत आहे. आमदार विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूनंतर ही अपघातांची मालिका सुरुच आहे. अशातच राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant stuck in sea) हे मोठ्या अपघातातून थोडक्यात बचावले आहेत. भर समुद्रात बोट बंद पडल्याने मंत्री उदय सामंत उडकून पडले होते. रायगडमधील मांडवा येथून स्पीड बोटने (speed boat) मुंबईतील गेट वे ॲाफ इंडियाच्या दिशेने येत असताना भर समुद्रात हा सर्व प्रकार घडला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय नेत्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. 

भर समुद्रात बंद पडली स्पीड बोट

उदय सामंत हे शुक्रवारी एका कार्यक्रमानिमित्त अलिबागला गेले होते. संध्याकाळी कार्यक्रम आटोपून सामंत हे मुंबईच्या दिशेने स्पीड बोटने रवाना झाले होते. मात्र भरसमुद्रातच त्यांची स्पीड बोट बंद पडली. बोट बंद पडल्याने सर्वच यंत्रणा ठप्प झाली. त्यामुळे मदतीसाठी कोणासोबत संपर्क साधणेही कठीण झाले. कॅप्टनला मदत मागवण्यासाठी आपत्कालीन संदेश पाठवणेही शक्य होत नव्हते. अशातच लाटा उसळत असल्यामुळे उदय सामंत यांची बोट भरकटू लागली आणि त्यावरील नियंत्रण सुटू लागले.

पीएमुळे थोडक्यात वाचला जीव

मात्र उदय सामंत यांच्या स्वीय सहाय्यकाने दाखवलेल्या प्रसंगावधानाने सर्वांचाच जीव वाचला. उदय सामंत यांच्या पीएने सर्वतोपरी प्रयत्न अखेर दुसरी बोट मागवली. यानंतर उदय सामंत यांच्यासह त्यांचा सहकाऱ्यांसह दुसऱ्या बोटीत चढले. सर्व जण दुसऱ्या स्पीड बोटने मुंबईला परतले आणि त्यानंतर उदय सामंत मंत्रालयात आपल्या कामासाठी निघून गेले.

दुसरीकडे राज्याचे माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांचाही शुक्रवारी गंभीर अपघात झाला. घोडबंदर येथून पालघरच्या दिशेने जात असताना दीपक सावंत यांच्या गाडीचा अपघात झाला. डंपरने दीपक सावंत यांच्य गाडीला मागून जोरदार धडक दिली. अपघातानंतर दीपक सावंत यांना रुग्णवाहिकेने मुंबई येथील क्रिटिकेअर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर डंपर चालकाला काशिमीरा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.