"जो पर्यंत दाराशी पाऊस पडत नाही...."; अंदाज चुकायला लागलेत म्हणणाऱ्या अजित पवारांना हवामान विभागाचे उत्तर

हवामान खात्याने रेड अलर्ट दिला अन् पावसाचा एक थेंब नाय अशी टीका अजित पवारांनी केली होती

Updated: Jul 26, 2022, 09:32 PM IST
"जो पर्यंत दाराशी पाऊस पडत नाही...."; अंदाज चुकायला लागलेत म्हणणाऱ्या अजित पवारांना हवामान विभागाचे उत्तर title=

सागर आव्हाड, झी मीडिया पुणे : राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी हवामान विभागाच्या (IMD) कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. याविषयी आता पुणे हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर (Krishnanand Hosalikar) यांनी स्पष्टीकरण दिले आहे. 

काही दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यात तीन दिवसांसाठी रेड अलर्ट देण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील शाळांना सुट्टी देण्यात आली होती. तर कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचे आदेश देण्यात आले होते.. परंतु त्या काळात पाऊस पडलाच नाही त्यामुळे अजित पवारांनी हवामान विभागावर टीका केली. त्यावर आता होसाळीकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

काय म्हणाले अजित पवार?

हवामान खात्याने रेड अलर्ट दिला अन् पावसाचा एक थेंब नाय. हे काही बरोबर नाही. ज्यावेळी हवामान खातं रेड अलर्ट वगैरे देतं, त्यावेळी त्याची दखल प्रशासन घेतं असतं. त्यांनी इशारा दिल्यानंतर शाळांना सुट्टी वगैरे दिली जाते. पण सध्या हवामान खात्याने अंदाज फारच चुकायला लागलेत", अशी टीका पुण्याचे माजी पालकमंत्री यांनी केली होती.

हवामान विभागाचे स्पष्टीकरण

"बऱ्याचदा असं असतं की, जो पर्यंत माझ्या दाराशी पाऊस पडत नाही तोपर्यंत पाऊस पडला नाही असं मला वाटतं.  गेल्या काही दिवसांपूर्वी मध्य महाराष्ट्रासाठी पावसाचे इशारे देण्यात आले होते, त्यावेळी रेड किंवा ऑरेंज अलर्ट होते. त्यावेळी आम्ही लिहीले होते की हा घाटभागापुरता पाऊस आहे. संध्याकाळच्या आकडेवारीनुसार 150 मिमी पाऊस पुण्याच्या घाटभागामध्ये कोसळला, असे हवामान विभाग प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी म्हटले आहे. 

"कधीकधी आम्ही इशारा देतो तेव्हा तो संपूर्ण जिल्ह्यासाठी असला तरी घाटभागापूरता मर्यादित असेल असे सांगतो. याची नोंद घेणे लोकांनी घेणे गरजेचे असते. याचा प्रभाव शहरी भागातही दिसण्याची शक्यता असते. त्यामुळे घाटभागावर पडलेल्या पावसाचे परिणाम शहरी भागात पाऊस न पडता देखील दिसू शकतात. त्यामुळे प्रशासनाने शाळा कॉलेज बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असेल. हवामान विभाग फक्त अलर्ट देतो. प्रशासन उर्वरित निर्णय घेते," असेही होसाळीकर म्हणाले.

"रेड अलर्ट दिले जातात तेव्हा ते संदेश नीट वाचले जात नाहीत. तसेच हवामान विषयीचा जागरुकता लोकांमध्ये निर्माण करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांशी संपर्क आहे आणि तो वाढवण्याची गरज आहे. पुढच्या २५ वर्षात काय लागणार आहे याबद्दल माहिती दिलेली आहे," असेही होसाळीकर यांनी स्पष्ट केले.