पीएमसी बँकेचं विलिनीकरण रखडलं, खातेदार आणखी हवालदिल

राज्य सहकारी बँकेत विलीन होणं शक्य नसल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलं आहे.

Updated: Jan 1, 2020, 06:13 PM IST
पीएमसी बँकेचं विलिनीकरण रखडलं, खातेदार आणखी हवालदिल title=

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : पीएमसी बँकेचं राज्य सहकारी बँकेत विलिनीकरण करुन राज्य सरकार पीएमसीच्य़ा खातेदारांना दिलासा देईल असं वाटलं होतं. पण पीएमसीच्या हजारो खातेदारांची निराशा झाली आहे. पीएमसी बँकेचं राज्य सहकारी बँकेत विलिनीकरण करणं शक्य नसल्याचं सरकारनं सांगितलं आहे. पीएमसी बँक ही मल्टिस्टेट आहे. तर राज्य सहकारी बँकेचं कार्यक्षेत्र हे फक्त राज्यापुरतं मर्यादित आहे. त्यामुळं ती राज्य सहकारी बँकेत विलीन होणं शक्य नसल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलं आहे.

राज्य सहकारी बँकेचा पर्याय बंद झाल्यानं सरकारनं आता इतर बँक विलिनीकरणासाठी इच्छुक आहे का याची चाचपणी सुरु केली आहे. राज्य सहकारी बँकेत विलिनीकरण झाल्यास खातेदारांना त्यांचे पैसे तातडीनं मिळतील अशी अपेक्षा होती. पण आता हे सगळं लांबलं आहे. त्यामुळं खातेदारांना त्यांचे पैसे कधी मिळतील याची खात्री आता कुणालाही देता येत नाही.

पंजाब आणि महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेच्या खातेधारकांना दिलासा मिळेल अशी आशा होती. पण ती आशाही आता मावळली आहे. राज्य सरकारचे राज्य सहकारी बँकेत पीएमसी बँकेचे विलीनीकरणाचे प्रयत्न सुरू असून, यासाठी राज्य सरकारची आरबीआयशी बोलण्याची देखील तयार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांना दिली होती. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला होता. पण आता त्यांची ही निराशा झाली आहे. त्यामुळे आता राज्य सरकार पुढे कोणता पर्याय शोधते हे पाहावं लागणार आहे.