मुंबई : रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षाची निवड आज झाली. माजी आमदार सुभाष बने यांचे चिरंजीव रोहन बने यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर उपाध्यक्षपदी महेश नाटेकर यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीनंतर शिवसैनिकांनी जोरदार फटाके फोडत जल्लोष साजरा केला. दरम्यान, रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी शिवसेनेतर्फे उदय बने, बाबू म्हाप, रोहन बने या तिघांची नावे आघाडीवर होती. अध्यक्षपदाचे नाव निवडणुकीआधी पक्षाच्या सभेत जाहीर करण्यात येणार होते. मात्र, उदय बने यांचे नाव मागे पडून रोहन बने या युवा कार्यकर्त्याला संधी देण्यात आली आहे.
दरम्यान, सध्याच्या शिवसेनेच्या धोरणाप्रमाणे नवीन उमेदवारांना प्राधान्य देण्यात आले आहे. त्यामुळे अध्यक्षपदाची माळ रोहन बने यांच्या गळ्यात पडली आहे. कॅबिनेट मंत्री आणि रत्नागिरीचे विद्यमान आमदार उदय सामंत यांनी रोहन बने यांनाच पसंती दिल्याचे सांगण्यात येत आहे.
रोहन बने हे संगमेश्वर तालुक्यातील कोसुंब गटातून निवडून आले आहेत. जिल्हा परिषद उपाध्यक्षपदासाठी सेनेचेचे महेश नाटेकर यांच्या नावाची घोषणा झाली. महेश नाटेकर गुहागर तालुक्यातील पडवे गटातून निवडून आले आहेत.
दुपारी अडीच वाजता निवडणूक प्रक्रिया सुरु झाली. शिवसेनेचे ३९ सदस्य असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकही अर्ज आला नाही. त्यामुळे रोहन बने आणि महेश नाटेकर हे बिनविरोध निवडून आले आहेत. यावेळी नव्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचे स्वागत सेना संपर्कप्रमुख सुधीर मोरे, जिल्हाप्रमुख विलास चाळके, किरण सामंत, माजी आमदार सुभाष बने, माजी अध्यक्ष स्वरुपा साळवी यांनी स्वागत केले.