शहीद मिलिंद खैरनार यांच्या भव्य स्मारकाचे लोकार्पण

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या मिलिंद खैरनार यांच्या भव्य स्मारकाचे लोकार्पण करण्यात आले.  

Updated: Feb 5, 2019, 07:20 PM IST
शहीद मिलिंद खैरनार यांच्या भव्य स्मारकाचे लोकार्पण  title=

नंदूरबार : जम्मू - काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या मिलिंद खैरनार यांच्या भव्य स्मारकाचे लोकार्पण करण्यात आलं. नंदूरबार जिल्ह्यातील बोराळे इथे उभारण्यात आलेल्या स्मारकाचे जिल्हाधिकारी मल्लिनाथ कलशेट्टी यांनी लोकार्पण केले. शहीद मिलिंद खैरनार हे गरुड कमांडो होते. सैन्य दलातील या विशेष तुकडीत कर्तव्य बजावत असताना मिलिंद खैरनार यांना वीरमरण आले.

खैरनार यांच्या या बलिदानातून देशाला आणि तरुणाईला प्रेरणा मिळावी यासाठी हे स्मारक उभारण्यात आले. जम्मू काश्मीरच्या बांदीपुरा भागात दहशतवाद्यांनी केलेल्या ग्रेनेड हल्ल्यात मिलिंद यांना हौतात्म्य प्राप्त झाले. मात्र रक्तबंबाळ अवस्थेतही त्यांनी दहशतवाद्यांना यमसदनी धाडले होते. देशाच्या सुरक्षेसाठी सहा प्रमुख मोहिमांमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.