10 दिवस सरकारला वेठीस धरणारा 'मराठा' आईच्या भेटीनं हळवा, मनोज जरांगेंचे पाणावले डोळे

Maratha Reservation: मनोज जरांगे पाटील यांची त्यांच्या आईने उपोषणस्थळी भेट घेतली. मागचे दहा दिवस राजकीय नेत्यांच्या प्रश्नांची खडा न खडा उत्तरे देणाऱ्या मनोज यांना आईशी बोलताना शब्द अपूरे पडत होते. 

Pravin Dabholkar | Updated: Sep 8, 2023, 05:16 PM IST
10 दिवस सरकारला वेठीस धरणारा 'मराठा' आईच्या भेटीनं हळवा, मनोज जरांगेंचे पाणावले डोळे  title=

Maratha Reservation: मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आतापर्यंत अनेक आंदोलने झाली. मूक मोर्चे निघाले. ही सर्व आंदोलने शिस्तबद्ध पद्धतीने, शांतता मार्गाने झाली. दरम्यान जालना येथील आंदोलनावर पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर राज्यभरातील मराठा समाज आक्रमक झाला. यावेळी मनोज जरांगे हे मराठा समाजाचा चेहरा बनून समोर आले. त्यांनी उपोषणाला बसून आंदोलनाची ताकद वाढवली. मागचे 10 दिवस त्यांनी सरकारला जेरीस आणले आहे. राज्यातील बड्या नेत्यांनी जरांगेंची भेट घेतली. त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. पण जरांगेंचा निश्चय दृढ होता. माझा जीव नाहीतर आरक्षण या भूमिकेवर ते ठाम राहिले. दरम्यान आज जरांगेमधील हळवा मराठा तरुण राज्याला पाहायला मिळाला. आईच्या भेटीने ते खूपच भावूक झाले. 

मनोज जरांगे पाटील यांची त्यांच्या आईने उपोषणस्थळी भेट घेतली. मागचे दहा दिवस राजकीय नेत्यांच्या प्रश्नांची खडा न खडा उत्तरे देणाऱ्या मनोज यांना आईशी बोलताना शब्द अपूरे पडत होते. मराठ्यांची मान झुकू न देणार नाही असा संकल्प त्यांनी यावेळी केला. माय-लेकाची ही भेट पाहून उपोषणस्थळी उपस्थित प्रत्येकालाच अश्रू अनावर झाले होते. 

जरांगे यांची प्रकृती ढासळल्याची बातमी सर्व माध्यमांनी दाखवली. आपल्या मुलाची प्रकृती ढासळल्याची माहिती त्यांच्या आईपर्यंत पोहोचली. आणि तात्काळ आई प्रभावती जरांगे यांनी उपोषण स्थळाकडे धाव घेतली. आपल्या आईला उपोषण स्थळी येताना पाहून जरांगे पाटील हे भावूक झाले. त्यांच्या काळजात एकच कालवाकालव सुरू झाली. मनोज यांनी आपल्या आईच्या पावर डोके टेकवून आशीर्वाद घेतला. त्यानंतर त्यांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली. आणि दोघांनाही काय बोलायचे सुचत नव्हते.

यानंतर जरांगे पाटलांनी पुन्हा आपली भूमिका मांडण्यास सुरुवात केली. पण त्यांच्या डोळ्यासमोर आईचे चित्र होते. भावूक झाल्याने  आपल्या बाळाला न्याय द्या, अशी विनंती त्यांनी सरकारला केली. तसेच आपल्या मुलाच्या पाठिशी ठामपणे उभे राहण्याचे आवाहन त्यांनी मराठा समाजाला केले. मराठा समाजाला आरक्षण द्या. माझ्या बाळाला न्याय द्या, असे त्यावेळी म्हणाल्या.

मी माझ्या गावासाठी माझ्या कर्मभूमीसाठी जीव पणाला लावला आहे. माझ्यासाठी संपूर्ण मराठा समाज पेटून उठला आहे. महाराष्ट्रातील माय माऊल्यांना मी यापुढे आरक्षणासाठी मुडदे पडू देणार नसल्याचा, मराठ्यांची मान खाली न झुकू देण्याचा शब्द देतो. माझ्या गावासह संपूर्ण महाराष्ट्र माझ्या मागे उभा आहे. त्याचा अभिमान आहे, असे ते म्हणाले. हे बोलताना जरांगे पाटलांच्या आई त्यांच्या डोळ्यांतील अश्रू पुसत होत्या. 

काय आहे मनोज जरांगे यांची मागणी

मनोज जरांगे यांनी दोन शब्द बदलण्याची मागणी केलीय. वंशावळीत कुणबी नोंद असल्यास कुणबी प्रमाणपत्र मिळेल या उल्लेखावर त्यांनी आक्षेप घेतलाय. वंशावळीच्या नोंदी आमच्याकडे नाहीत, त्यामुळे सरकारने सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावं अशी मागणी त्यांनी केलीय. अध्यादेशातले 'वंशावळ असल्यास' हे शब्द वगळून सरसकट प्रमाणपत्र द्यावं अशी मागणी त्यांनी केलीय. सुधारणा केलेला अध्यादेश घेऊन मुख्यमंत्र्यांनी स्वतः यावं अशी मागणी त्यांनी केली आहे.