राज्यात सध्या मराठा आऱक्षणासाठी एल्गार सुरु असून मनोज जरांगे यांच्यासह निघालेलं भगवं वादळ मुंबईच्या वेशीवर दाखल होत आहे. मनोज जरांगे यांनी तोडगा निघत नाही तोपर्यंत आपण मागे हटणार नाही असं स्पष्ट केलं आहे. यादरम्यान राज्यभरातील मराठा कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. मराठा कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले आहेत. जुन्नर विधानसभेचा दौरा करत असताना अजित पवारांच्या ताफ्यासमोर काळे झेंडे दाखवत निषेध नोंदवण्यात आला.
मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवत निषेध नोंदवला आहे. अजित पवार पुण्यातील जुन्नर विधानसभेचा दौरा करत आहेत. यादरम्यान अहमदनगर-कल्याण महामार्गावरील आळे फाटा परिसरात हे आंदोलन करण्यात आलं.
'आम्हाला हौस नाही, हे आता शेवटचं....,' मनोज जरांगेंनी शिंदे, फडणवीसांचा उल्लेख करत दिला इशारा
अजित पवारांनी मराठा समाजाला उद्देशून केलेल्या वक्तव्याचा निषेधार्ह हे झेंडे दाखवण्यात आले. मनोज जरांगे यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी करण्यात आलेल्या आंदोलनावेळी अजित पवारांनी हा दौरा रद्द करावा, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र मराठा समाजाच्या या मागणीला झुगारून अजित पवार दौऱ्यावर आले. त्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला. त्यांनी ताफ्याला काळे झेंडे दाखवत, आरक्षण मिळावं यासाठी घोषणाबाजी केली. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.
दरम्यान मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी चर्चेसाठी येण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले आहेत की, "मी ही विनंती करणार नव्हतो, पण मला तोडगा काढायचा आहे. आम्ही मजा करायला आलेलो नाही. आमचे लोक वाऱ्यात, थंडीत कुडकुडत आहेत. मुंबईप्रमाणे आमचेही हाल होत आहेत. दोघांचेही हाल होऊ न देणं हे सरकारच्या हातात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी प्रत्यक्ष चर्चेला येऊन तोडगा काढावा अशी समाजाच्या वतीने शेवटची विनंती आहे. आम्हालाही मुंबईत येण्याची हौस नाही. अन्यथा मुंबईच्या दिशेने येत आहे. त्यांनी येऊन लगेच तोडगा काढावा," असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. पुढे ते म्हणाले, तिघं मिळून या किंवा एकाने या, पण यात लक्ष घाला ही समाजाच्या वतीने विनंती आहे.
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. मात्र, काहीजण टोकाचं बोलत आहेत. मुंबईत येण्याची भाषा करत आहेत. कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला तर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा अजित पवारांनी जरांगेंचं नाव न घेता दिला होता.