'मुख्यमंत्री मराठा समाजाचा राजकारणासाठी वापर करतायत'

'निर्णय घेतला नाही तर सत्तेतील एकाही मंत्र्याला रस्त्यावर फिरू देणार नाही'

Updated: Jul 28, 2020, 01:43 PM IST
'मुख्यमंत्री मराठा समाजाचा राजकारणासाठी वापर करतायत' title=

पुणे : 'उद्धव ठाकरे हे मराठा समाजाचा राजकारणासाठी वापर करताय. काही मराठा समाजातील लोक दलाली करताय त्यांचाही लवकर बंदोबस्त करू' असे नानासाहेब जावळे पाटील यांनी म्हटले. पुण्यात मराठा आरक्षण संदर्भात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मराठा आंदोलनतील ४२ आत्महत्याग्रस्त कुटुंबांचा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी त्वरित मार्गी लावावा अन्यथा वर्षा बंगल्यासमोर आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला. ९ ऑगस्ट पर्यंत आमचा निर्णय घेतला नाही तर सत्तेतील एकाही मंत्र्याला रस्त्यावर फिरू देणार नसल्याचेही ते म्हणाले.

आम्हाला गोळ्या झाडा, जेलमध्ये टाका पण आम्ही मागे हटणार नाही. मराठा आंदोलनातील ४२ आत्महत्याग्रस्त कुटुंबांना प्रत्येकी दहा लाख आणि घरातील एकाला शासकीय नोकरी द्यावी. आधी हा निर्णय घ्यावा अन्यथा आम्ही उपसमितीच्या बैठकीला जाणार नाही असे ते म्हणाले. 
 
मराठा क्रांती ठोक मोर्चाने नोव्हेंबर २०१८ ला आझाद मैदानावर दहा दिवस आमरण उपोषण आणि ठिय्या आंदोलन केलं होतं. तिथं उद्धव ठाकरे आणि माजी मंत्री दिवाकर रावते यांनी येऊन आश्वासन दिलं होतं. त्यामुळे आता चर्चेची गरज नसल्याचे नानासाहेब म्हणाले.

दोन वर्षे होऊन गेले तरी मुख्यमंत्री आम्हाला चर्चा सुरू आहे असं सांगतायत. फाईलवर सही करायची बाकी आहे पण आम्हाला फक्त चॉकलेट दिलं असे आंदोलनात आत्महत्याग्रस्त कुटुंबातील व्यक्ती आसाराम एंडाईत यांनी यावेळी म्हटले.उद्धव ठाकरे आता मुख्यमंत्री आहे आता काय बाकी आहे ? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.