मनोज जरांगेंना विरोध करणं भुजबळांना महागात पडलं! मराठा समाजाकडून मोठा धक्का; आता मतांसाठी...

Maratha Aarakshan Manoj Jarange Vs Chhagan Bhujbal: छगन भुजबळ यांनी उघडपणे मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीला विरोध करताना ओबीसीमधून मराटा समाजाला आरक्षण देऊ नये असं म्हटलं आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Oct 21, 2023, 02:55 PM IST
मनोज जरांगेंना विरोध करणं भुजबळांना महागात पडलं! मराठा समाजाकडून मोठा धक्का; आता मतांसाठी... title=
मराठा आरक्षणासंदर्भात भुजबळांनी घेतली मनोज जरांगे पाटलांविरोधाक भूमिका

Maratha Aarakshan Manoj Jarange Vs Chhagan Bhujbal: मराठा आरक्षणासाठी लढणारे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यावे अशी मागणी केली आहे. जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासंदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी राज्यामध्ये सत्तेत असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपा आणि अजित पवार गटाला दिलेली एका महिन्याची मुदत 24 ऑक्टोबर रोजी संपत आहे. याच पार्श्वभूमीवर जरांगे पाटील सध्या महाराष्ट्रभर सभा घेत आहेत. जरांगे पाटील यांनी ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीला अजित पवार गाटातील नेते आणि शिंदे सरकारमधील नेते छगन भुजबळ यांनी विरोध केला आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही पण त्यांना ओबीसीमधून आरक्षण न देता विशेष वेगळं आरक्षण द्यावं असं भुजबळ यांनी जरांगे पाटलांच्या मागणीला विरोध करताना म्हटलं आहे. मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देण्यास आमचा विरोध कायम आहे, असं भुजबळ यांनी म्हटलं आहे. भुजबळ यांनी सुरुवातीपासूनच आपली भूमिका स्पष्ट केली. याचवरुन जरांगे पाटील यांनी अनेकदा भुजबळांना जवळपास सर्वच सभांमध्ये लक्ष्य केलं. या दोघांमध्ये वाद सुरु असतानाच या वादाचा एक फटका भुजबळ यांना बसला आहे. भुजबळ समर्थक मराठा समाजातील पदाधिकाऱ्यांनी बंडाचं निशाण फडवलं आहे.

थेट भुजबळांचा उल्लेख करत...

छगन भुजबळ यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी भूमिका मांडणाऱ्या जरांगे पाटलांविरोधात भूमिका घेतल्याने त्यांना मोठा फटका बसणार आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आणि भुजबळांचे मोठे समर्थक असलेल्या जयदत्त होळकर यांनी भुजबळांची साथ सोडली आहे. भुजबळ यांना याचा मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जयदत्त होळकर हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रांतिक सरचिटणीस आहेत. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत भुजबळांना मोठा धक्का दिला आहे. त्यांनी थेट भुजबळ यांच्या भूमिकेचा उल्लेख करत राजीनामा दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.

मतांची जुळवाजूळव करताना दमछाक

मराठा आरक्षणाला मंत्री छगन भुजबळ विरोध करत असल्याने मी राजीनामा देत आहे. यापुढे फक्त मराठा समाजासाठी आपण काम करणार आहोत. मराठा समाजाचा झेंडा आपण हाती घेतला आहे, असं होळकर यांनी म्हटलं आहे. भुजबळांचे समर्थक असलेल्या निकटवर्तीयांनीच विरोधात भूमिका घेतल्याने अजित पवार गटाच्या अडचणी वाढणार आहेत. भुजबळांविरोधात भूमिका घेत मराठा समाजातील पदाधिकाऱ्यांनी थेट राजीनामा अस्र हाती घेतल्याने भुजबळांचं टेन्शन वाढलं आहे. याच कारणामुळे विधानसभा निवडणुकीमध्ये लासलगावसहीत 46 गावांमधून मतांची जुळवाजूळव करताना भुजबळांची दमछाक होणार असल्याचा अंदाज राजकीय अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.

अनेकांनी केलाय विरोध पण...

केवळ भुजबळच नाही तर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनीही मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देण्यास विरोध केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार या दोघांनीही ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असं स्पष्ट केलं आहे. असं असलं तरी जरांगे-पाटलांनी आपल्या भाषणातून छगन भुजबळ आणि वकील गुणरत्न सदावर्तेंवर थेट नाव घेऊन टिका केली आहे.