मनोज जरांगे-पाटलांना सुप्रिया सुळेंची हात जोडून विनंती! म्हणाल्या, 'त्यांनी आपल्या...'

Maratha Aarakshan Supriya Sule Comment: राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी मनोज जरांगे पाटील यांचा उल्लेख करत त्यांना अगदी हात जोडून एक विनंती केली आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Oct 31, 2023, 08:51 AM IST
मनोज जरांगे-पाटलांना सुप्रिया सुळेंची हात जोडून विनंती! म्हणाल्या, 'त्यांनी आपल्या...' title=
सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावरुन आपलं म्हणणं मांडलं

Maratha Aarakshan Supriya Sule Comment: मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी शांततेच्या मार्गाने सुरु असलेल्या आंदोलनाला सोमवारी गालबोट लागलं. राज्यातील अनेक भागांमधून हिंसाचाराच्या घटनांच्या बातम्या समोर आल्या. बीडमध्ये 2 आमदारांची घर आंदोलकांनी जाळली. याच पार्श्वभूमीवर रात्री उशीरा बीड आणि धाराशीवमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पुढील आदेश येईपर्यंत ही संचारबंदी लागू राहणार आहे. हिंसांचाराच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर यंत्रणांना अर्ल्ट देण्यात आला आहे. असं असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी राज्यातील नागरिकांना शांततेचं आव्हान केलं आहे. तसेच सुप्रिया सुळेंनी आमरण उपोषण करत असलेल्या मनोज जरांगे पाटलांनाही अगदी हात जोडून एक विनंती केली आहे. 

महाराष्ट्रातील जनतेला केलं आवाहन

सुप्रिया सुळे यांनी सोमवारी रात्री उशीरा आपल्या एक्स (पूर्वीचं ट्वीटर) अकाऊंटवरुन एक पोस्ट करत महाराष्ट्रातील लोकांना एक आवाहन केलं आहे. राज्यात होत असलेल्या हिंसक घटनांच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळेंनी, "राज्यात काही ठिकाणी अज्ञात व्यक्ती सार्वजनिक मालमत्ता, बसची जाळपोळ, तोडफोड करीत आहेत. यामुळे अनेक ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. माझे नागरीकांना नम्र आवाहन आहे की कृपया आपण सर्वांनी संयम ठेवावा व शांतता राखावी." पुढे बोलताना सुप्रिया सुळेंनी, "आरक्षणाचे आंदोलन विधायक मार्गाने सुरु आहे. त्याला गालबोट लावण्याचे प्रयत्न काही लोक करीत आहेत," असं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

हात जोडून केली विनंती

तसेच सुप्रिया सुळे यांनी याच पोस्टमध्ये पुढे लिहिताना, "माझे मनोज जरांगे पाटील यांना नम्र विनंती आहे की, त्यांनी आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी," असंही म्हटलं आहे. या पोस्टमध्ये सुप्रिया सुळे यांनी हात जोडून नमस्कार करत असल्याचा इमोजीही वापरला आहे. रविवारी सायंकाळी उपस्थितांबरोबर संवाद साधण्यासाठी मनोज जरांगे-पाटील स्टेजवर उभे राहण्याचा प्रयत्न करत असतानाच अशक्तपणामुळे ते कोसळले. त्यानंतर उपस्थितांच्या आग्रहानंतर त्यांनी थोडं पाणी प्यायलं.

नक्की वाचा >> 'खरंतर बोलू नये पण परिस्थिती अशी आहे म्हणून...'; उपोषण करणाऱ्या जरांगे पाटलांच्या प्रकृतीसंदर्भात डॉक्टरची पोस्ट

आज म्हणजेच मंगळवारी (31 ऑक्टोबर 2023 रोजी) मनोज जरांगेंच्या आमरण उपोषणाचा सातवा दिवस आहे.

मनोज जरांगे-पाटील हिसांचारासंदर्भात काय म्हणाले?

सोमवारी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागांमध्ये झालेल्या हिंसाचारासंदर्भात मनोज जरांगे-पाटील यांनी प्रतिक्रिया नोंदवली. "जाळपोळीला माझं समर्थन नाही. हिंसाचार थांबवला नाही तर मला नाईलाजाने निर्णय घ्यावा लागेल. बहुतेक मला असं वाटतंय की हिंसाचार करणारे सत्ताधारी असतील. त्यांच्याच हाताने जाळून घेतील अन् मराठ्यांच्या आंदोलनाला डाग लावतील, अशी शंका मला वाटलीच होती. बऱ्याचदा आंदोलन चिघळण्याचं काम केलं जातं. मात्र, आरक्षण मिळेपर्यंत सर्वांनी शांततेत आंदोलन करावं," असं आवाहन मनोज जरांगे-पाटील यांनी आपल्या समर्थकांना केलं.