प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर : दिवाळीनिमित्त अनेकांनी खरेदीचा बेत आखलाय. प्रत्येकजण नवनवीन गोष्टी खरेदी करतोय. मात्र समाजातील गरजूंसाठी कोल्हापुरात एक अनोखा उपक्रम राबवला जातोय..
दिवाळीच्या निमित्ताने प्रत्येकजण खास तयारी करत असतो. विशेषतः कपडे खरेदीचे प्लॉन सारेच आखतात. मात्र समाजातील अनेकाकडे ना दोन वेळचे जेवण आहे ना अंग झाकण्यासाठी पुरेसे कपडे. याच गोष्टीचा विचार करुन दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील सी.आर.चौकात माणुसकीची भिंत उभारण्यात आलीय.
जुने-नवे कपडे, ड्रेस, पँट, कुर्ते, जीन्स, लहान मुलांचे कपडे, साड्या यासह विविध वस्तू या माणुसकीच्या भिंतीवर आणून ठेवल्या जातायत. अनेक गरजू इथं येऊन आपल्याला हव्या असणा-या वस्तू घेऊन जातायत.
माणुसकीची भिंत या उपक्रमाला कोल्हापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभतोय. समाजातील उपेक्षित आणि गरजूंनाही दिवाळीचा आनंद घेता यावा यासाठी सुरु करण्यात आलेला हा उपक्रम म्हणजे खराखुरा माणुसकीचा धर्म असं म्हटल्यास वावगं ठरु नये.