'सगेसोयऱ्यांची 2 दिवसांत अंमलबजावणी करा, अन्यथा...', मनोज जरांगे पाटलांचा इशारा

Maratha Reservation: आम्हाला नको असलेलं आऱक्षण सरकार देत आहे. सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी करण्यात नेमकी अडचण काय आहे? अशी विचारणा मनोज जरांगे यांनी केली आहे. तसंच 24 फेब्रुवारीला सकाळी 10.30 वाजता रास्ता रोको करण्याचं आवाहन केलं आहे.   

शिवराज यादव | Updated: Feb 21, 2024, 02:12 PM IST
'सगेसोयऱ्यांची 2 दिवसांत अंमलबजावणी करा, अन्यथा...', मनोज जरांगे पाटलांचा इशारा title=

Maratha Reservation: आम्हाला नको असलेलं आऱक्षण सरकार देत आहे. सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी करण्यात नेमकी अडचण काय आहे? अशी विचारणा मनोज जरांगे यांनी केली आहे. मनोज जरांगे यांनी आंतरवाली सराटी येथे लोकांशी संवाद साधाताना कुणबी प्रमाणपत्र ने घेणाऱ्यांना पश्चाताप होईल असंही सांगितलं. आता ओबीसीतून आरक्षण मिळाल्याशिवाय माघार नाही असा इशाराही मनोज जरांगे यांनी दिला आहे. दरम्यान यावेळी त्यांनी छगन भुजबळ यांचा उल्लेख न करता त्यांच्यावर निशाणा साधला आहे. तसंच 24 फेब्रुवारीला सकाळी 10.30 वाजता राज्यभरात रास्ता रोको करण्याचं आवाहन केलं आहे. 

"आम्हाला नको असलेलं आऱक्षण सरकार देत आहे. सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी केली तरच आम्ही माघार घेऊ. दोन दिवसांत अंमलबजावणी करा. मराठा आणि कुणबी सरसकट करायला काय अडचण आहे? कुणबी प्रमाणपत्र ने घेणाऱ्यांना पश्चाताप होईल. 5-6 जण वगळता सर्व मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण हवं आहे. आता आपले कुणबी असल्याचे पुरावे सापडले आहेत. त्यामुळे कुणबी मराठे एकच आहेत. ज्यांना कुणबी नको ते आपल्यावर रुसले आहेत त्यामुळे ज्यांना मराठा म्हणून आरक्षण मिळालंय त्यांनी ते घ्यावं," असं मनोज जरांगे म्हणाले आहेत. 

"ज्याची कुणबी नोंद सापडली त्या कुणबी नोंदीचा आधार घेऊन त्याच्या सग्या सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या. आता ओबीसीतून आरक्षण मिळाल्याशिवाय माघार नाही," असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. तसंच यावेळी त्यांनी छगन भुजबळांचा उल्लेख न करता त्यांच्यावर जोरदार टीका केली. "तुला काय माहित मी गोधडी अंगावर घेऊन आत मोबाईलमध्ये काय पाहतो. त्याला हे कोण सांगतं हे तुला माहिती आहे. रात्रीच येऊन बघा मी गोधडीत काय करतो ते," असा टोला त्यांनी लगावला. 

"मी तुझ्यासारखा भेकड नाही. माझी गोधडी फार बेकार आहे. तू माझ्या गोधडीत घुसायचं बंद कर. घातपातासाठी कोणता कार्यकर्ता पाठवला होता हे मला चांगलंच माहिती आहे,ठ असं सांगत मनोज जरांगे यांनी नाव घेता छगन भुजबळांवर निशाणा साधला. मराठा आणि कुणबी एकच आहे असा अध्यादेश काढावा. राज्यात सगेसोयरे कायदा पारीत करा. अंतरवालीसह राज्यातील मराठा आंदोलकांवरील गुन्हेमागे घ्या अशी मागणीही त्यांनी केली आहे. 

तू ओबीसीचा नेता आहे तर मग काल अधिवेशनात ओबीसींचा एखादा प्रश्न का मांडला नाही? असा प्रश्न त्यांन भुजबळांना विचारला. हैद्राबाद गॅझेट स्वीकारा, 1891च्या जणगणनेत मराठा आणि कुणबी एकच आहे ते सुद्धा स्वीकारा. बॉम्बे गव्हर्नमेंटचं सुद्धा गॅझेट घ्या. सातारा संस्थानचाही गॅझेट स्वीकारा, न्या.शिंदे समितीला मुदतवाढ द्या, तालुका स्तरावर नेमलेल्या समितीने न्या शिंदे समितीला काय अहवाल दिला ते तपासा, नुसती मुदतवाढ देऊ नका समितीकडून कामही करून घ्या असंही ते म्हणाले. 

दोन दिवसांच्या आत सगेसोयरेबाबत आलेल्या हरकती निकाली लावा. आता आंदोलन कस करायचं यावर उपस्थितांचं मत घेणं सुरू केलं आहे. मराठवाड्यातील 1 हजार 400 गावात कुणबी नोंदी सापडल्या आहेत. ज्याची कुणबी सापडली आहे त्यांनी कुणबी प्रमाणपत्र काढून घ्यावे. कुणबी प्रमाणपत्र काढण्यात अडचणी येत असतील तर त्या अडचणी दूर करण्यासाठी तालुका पातळीवर समाजाच्या पैशातून कार्यालये तयार करावा. 24 तारखेपर्यत सगेसोयरे कायदा करा अन्यथा आंदोलन सुरू करणार असा इशारा त्यांनी दिला आहे.