'तुम्ही चूक करता म्हणून...'; देवेंद्र फडणवीसांच्या 'मी ब्राह्मण' वक्तव्यावर जरांगेंचे प्रत्युत्तर

Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत खुली चर्चा करण्यासाठी जरांगे यांची शिंदे-फडणवीस यांनी अंतरवालीत यावं. तुम्हाला कुणीही धक्का लावणार नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

नीतेश महाजन | Updated: Oct 29, 2023, 09:41 AM IST
'तुम्ही चूक करता म्हणून...';  देवेंद्र फडणवीसांच्या 'मी ब्राह्मण' वक्तव्यावर जरांगेंचे प्रत्युत्तर title=

नितेश महाजन, झी मीडिया, जालना : सामंजस्याची भूमिका म्हणजे काय? तुम्हाला निर्णय घेण्यासाठी 40 दिवस दिले आणखी काय? करायला पाहिजे,असा सवाल मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मुख्यमंत्र्यांना (CM Eknath Shinde) केलाय. जरांगे यांनी आरक्षणाबाबत सामंजस्याची भूमिका घ्यावी असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं. यावर आता मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आरक्षणाबाबत खुली चर्चा करण्यासाठी जरांगे यांनी शिंदे-फडणवीस यांना अंतरवालीत येण्याची ऑफर देखील दिली आहे.नेत्यांना आम्ही गावबंदी केली असली तरी शिंदे फडणवीस यांनी खुल्या चर्चेसाठी अंतरवालीत यावं,तुम्हाला कुणीही धक्का लावणार नाही, आपण खुली चर्चा करू असं जरांगे म्हणालेत. समितीला 10 हजार पुरावे सापडले आहेत.पुरावे कुठेही जमा करा, पण आरक्षण संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाला लागू करा. आरक्षण फक्त मराठवाड्यासाठी द्यावं ही माझी मागणीच नाही त्यामुळे अर्धवट आरक्षण मी घेणारही नाही असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

सोमवारी बैठक न घेता मराठा आरक्षणाबाबत विशेष अधिवेशन घ्या,आमचा जीव गेल्यावर विशेष अधिवेशन घेता काय? असा सवाल त्यांनी केला. "जरांगे पाटलांना दवाखान्यात नेल्याची अफवा पसरली आहे. ही अफवा ऐकू नका. मी इथेच आहे. मला घेऊन जाणाऱ्याला मी झटका दाखवीन. मला सरकारने नेल्यास मीसुद्धा झटका दाखवीन. सरकारमध्ये तशी ताकद नाही," असे जरांगे पाटील म्हणाले. बीडमध्ये बस पेटवण्याच्या घटनेबाबतही मनोज जरांगे पाटील यांनी भाष्य केले. मराठा समाज शांततेत आंदोलन करत आहे. या उद्रेकाला आपलं समर्थन नाही, असे जरांगे म्हणाले. मराठा आंदोलन बदनाम करण्याची कुणीतरी सुपारी घेतली अशी शंका देखील त्यांनी यावेळी बोलून दाखवली.

मला जाणीवपूर्वक टार्गेट केलं जातं असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटल्यावर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "तुम्ही तुमची जात बदलू शकत नाही तशी आम्हीही जात बदलू शकत नाही. बरळल्यासारखं बोलू नका. तुम्हाला कुणाला टोमणे हनायचा ते आम्हाला माहीत नाही. तुमच्यात आम्ही कधीही जात बघितली नाही. तुम्ही बोलताना चुकता. चूक तुम्ही करता म्हणून लोक तुम्हाला टार्गेट करतात. तुम्ही सोमवारी समितीची बैठक रद्द करून अधिवेशन बोलवा आणि आरक्षण द्या. मराठे तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील. तुम्ही काम करणार नसाल तर लोक तुम्हाला नावच ठेवतील," असा टोला त्यांनी फडणवीस यांना लगावला आहे.