Manoj Jarange : बीड जिल्ह्यात खोट्या गोष्टींच्या नावाखाली मराठा समाजाला त्रास देऊ नका. मराठा समाज शांत आहे. नरड्याला लागेपर्यंत अन्याय सहन करू पण आम्ही सतत अन्याय सहन करणार नाही, असे मनोज जरांगे म्हणाले. बीडच्या विविध भागात मतदान केल्यावरून मराठा समाजाच्या लोकांना मारहाण झाली. सरकार या घटनांना खतपाणी घालतेय. यांच्या नेत्यांना पाठीशी घालतेय, अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी नाव न घेता धनंजय मुंडे यांच्यावर केलीय.
त्यांचे लोक मराठ्यांच्या पाठीमागे लावले जात आहेत. ज्या जातीचे लोक मराठयांना त्रास देतील त्यांना आम्ही विधानसभेत कचका दाखवणार, असा इशारा जरांगेंनी दिला. यांना असं पाडतो की 5 पिढ्या यांच्या उभ्या राहणार नाहीत, असेही ते म्हणाले.
जो आमच्या विरोधात बोलतो त्याच्या नेत्याला परळीत निवडून येऊ देणार नाही असा इशारादेखील जरांगे यांनी दिलाय. सरकारने आमच्या मागण्या पूर्ण कराव्या अन्यथा विधानसभेला 288 जागा लढवणार असल्याचं देखील ते म्हणाले. अंतर वाली सराटी येथील पत्रकार परिषदेतून त्यांनी हा इशारा दिला.
बीड जिल्ह्यात मराठा समाजाच्या लोकांना मारहाण झाली यावर ते बोलत होते. बीडच्या पोलीस अधीक्षकांसह राज्याच्या गृहमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घालण्याची मागणीही त्यांनी केली.
आज मोदी सरकारचा शपथविधी सोहळा होणार आहे.ही चांगली गोष्ट आहे त्यांनी गरिबांसाठी काम करावं श्रीमंतासाठी काम करणं बंद कराव तरच त्यांना शुभेच्छा देतो असंही जरांगे म्हणाले. जे गरिबांसाठी सरकार चालतं त्यांनाच मी शुभेच्छा देतो.विनंती करतो असंही ते म्हणाले.
सगे सोयरे कायद्याच्या मागणीसाठी जालन्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटलांनी कालपासून आमरण उपोषण सुरू केलं आहे. त्यांच्या आमरण उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. काल डॉक्टरांच्या सल्ल्याने पथकाने 2 वेळा जरांगे पाटलांची तपासणी केली. दरम्यान अंबडच्या महिला तहसीलदारांनी देखील जरांगे पाटलांची भेट घेऊन उपोषण सोडण्याची विनंती केली. मात्र ही विनंती जरांगे यांनी धुडकावून लावली.